Marathi News> भारत
Advertisement

'मला आधी आईचे दागिने द्या,' मुलाने आपल्याच आईचा अंत्यविधी रोखला, नंतर थेट चितेवरच झोपला, पाहा VIDEO

गावकरी अंत्यविधीची तयारी करत असताना, ओमप्रकाश थेट चितेवर जाऊन झोपला. जोपर्यंत आईच्या चांदीच्या बांगड्या देत नाही तोपर्यंत अंत्यविधी करुन देणार नाही अशी अटच त्याने घातली होती.   

'मला आधी आईचे दागिने द्या,' मुलाने आपल्याच आईचा अंत्यविधी रोखला, नंतर थेट चितेवरच झोपला, पाहा VIDEO

आई म्हणजे सर्वस्व असते. जगात आल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत आई आपल्यासोबत असते. आईचं महत्त्वं काय हे ज्याच्या डोक्यावर मायेचं छत्र नसतं त्याच्याहून चांगलं कोणी सांगू शकणार नाही. मुलांसाठी आई आपलं सर्वस्व पणाला लावते. पण जेव्हा तीच आई या जगातून जाते आणि मुलं तिच्या दागिन्यांसाठी भांडतात तेव्हा तिच्या आत्म्याला होणाऱ्या वेदना किती असह्य असतील याचा कोणी विचारही करु शकत नाही. राजस्थानात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये कलयुगातील मुलाने दागिन्यांसाठी थेट आईचा अंत्यविधीच रोखला. 

राजस्थानच्या कटपुतली-बेहरोर जिल्ह्यात एका मुलाने आईच्या चांदीच्या बांगड्या मिळाव्यात यासाठी अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. 

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुरी देवी यांचं 3 मे रोजी निधन झालं होतं. त्यांना सात मुलं आहेत. सहा मुलं गावात एकत्र राहत असून, एक मुलगा ओमप्रकाश वेगळा राहतो. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ओमप्रकाश आणि त्याच्या सहा भावांमध्ये संपत्तीवर वाद सुरु आहे. भुरी देवी यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब आणि गावकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले. 

अंत्यविधीआधी गावकऱ्यांनी भुरी देवी यांच्या अंगावरी दागिने काढले आणि मोठा मुलगा गिरधारीच्या हातात सोपवले. यामध्ये चांदीच्या बांगड्याही होत्या. यामुळे ओमप्रकाशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यामुळे ओमप्रकाशनेही पार्थिवाला खांदा दिला. 

पण जेव्हा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानात पोहोचला तेव्हा एकच गोंधळ सुरु झाला. गावकरी चितेसाठी लाकडं रचच असताना ओमप्रकाशने आईच्या बांगड्या आणि इतर दागिने आपल्याकडे सोपवले जावेत अशी मागणी सुरु केली. ही आरडाओरड करत असताना तो इतका हट्टाला पेटला की, थेट चितेवर जाऊनही झोपला. गावकरी सांगत असतानाही तो मात्र माघार घेत नव्हता. यादरम्यान त्याच्यात आणि भावांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. 

जवळपास दोन तास ओमप्रकाश गोंधळ घालत होता. गावकरी, नातेवाईक विनंती करत असतानाही तो काहीच ऐकत नव्हता. अखेर आईचे दागिने आणून स्मशानातच त्याच्याकडे सोपवण्यात आले.

दागिने मिळाल्यावर ओमप्रकाश चितेवरुन हटला आणि अंत्यविधी करण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आमि संताप आहे. अंत्यविधी करत असताना या पवित्र कामात कौटुंबिक वाद आणणं योग्य नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 

भुरी देवी यांच्या पतीचं दोन वर्षांपूर्वीच निधन झालं. ओमप्रकाश सात भावांमध्ये पाचव्या क्रमांकाचा होता. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Read More