Crime News: केरळच्या थिरुअंनतपुरम येथे एक 23 वर्षीय तरुण पोलीस ठाण्यात पोहोचला असता, सगळ्यांची पायाखालची जमीनच सरकली. याचं कारण त्याने पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आपण सहा जणांना ठार केल्याची माहिती दिली. तरुणाने हत्या केलेल्यांमध्ये त्याची आई, भाऊ आणि प्रेयसीचा समावेश होता. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांची हत्या झाल्याचं सांगत घटनेला दुजोरा दिला आहे.
सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. या हत्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या आहेत. आरोपी अफन याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला. यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी तरुणाने दिलेल्या माहितीला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, तरुणाने आपला 13 वर्षीय भाऊ एहसान, आजी सलमा बिवी, काका लतीफ, आत्या शहिहा आणि प्रेयसी फरसाहना यांची हत्या केली आहे. अफनच्या आईची प्रकृती सध्या गंभीर असून, थिरुअनंतपूरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत.
आरोपीने पोलिसांना आपण विषप्राशन केली असल्याची माहिती दिली. यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला नेण्यात आलं. पोलिसांना अद्याप या हत्येमागील कारण समजलेलं नाही. तसंच याप्रकरणी तपास सुरु केला आहे.