दिल्लीमधील गुलाबी बाग परिसरात 17 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने तरुणाचे आपल्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून निर्दयीपणे हत्या केली. आरोपीने तरुणाला सिलेंडरने मारहाण करत ठार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहाशेजारी असलेल्या बेडवर बसून पाणी पित होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, त्याचं नाव मुकेश ठाकूर आहे. पीडित मागील शनिवारपासून त्याच्यासोबत राहत होता. मंगळवारी सकाळी गुलाबी बाग पोलीस ठाण्याला एक फोन आला होता. फोन करणाऱ्याने अंध मुघल परिसरातील एका घराच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली. तसंच फोन करणाऱ्याने यावेळी एक व्यक्ती रुममध्ये मृतदेहाशेजारी अस्लयाचंही सांगितलं.
"मुकेशची पत्नी शनिवारी हरियाणामधील तिच्या मूळ गावातून पीडित तरुणाला सोबत घेऊन आली होती, ज्यामुळे मुकेश चिडला होता. तो गेल्या काही दिवसांपासून तरुणावर आणि त्याच्या पत्नीवर बारकाईने लक्ष ठेवून होता. त्याचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध आहेत असा संशय त्याला होता," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
"मंगळवारी सकाळी मुकेश त्याच्या पत्नीच्या कामावर जाण्याची वाट पाहत होता. त्यानंतर, सकाळी 9.30 च्या सुमारास, मुकेशने झोपेत असताना एलपीजी सिलिंडर उचलला आणि पीडित तरुणार हल्ला केला. त्यानंतर तो बेडवर बसला आणि पाणी पीत असताना काही शेजाऱ्यांनी त्याला पाहिले आणि पोलिसांना बोलावलं," असं अधिकाऱ्याने पुढे सांगितले.