Marathi News> भारत
Advertisement

पत्नी देवदर्शनाला जाताच पतीने विष पाजून अख्खं कुटुंब संपवलं, मोलकरणीने खिडकीतून दृश्य पाहून हादरली

तरुण चौहान यांची पत्नी राजस्थानच्या खातू श्यामजी मंदिरात गेली होती. त्या परतीवर असून घरी नेमकं काय घडलं आहे याची तिला कल्पनाच नव्हती.   

पत्नी देवदर्शनाला जाताच पतीने विष पाजून अख्खं कुटुंब संपवलं, मोलकरणीने खिडकीतून दृश्य पाहून हादरली

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका व्यक्तीने आपली आई आणि 12 वर्षाच्या मुलाची विष पाजून हत्या केली. यानंतर त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तरुण चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याची पत्नी राजस्थानच्या सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात गेली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती सध्या परतीच्या मार्गावर आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोलकरीण घरी पोहोचली असता तिला तरुण चौहान यांचा मृतदेह लटकत असल्याचं दिसलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावेळी तरुण यांच्या आई आणि मुलाचा मृजदेह बेडवर पडलेला होता. मोलकरणीने तात्काळ पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी सूरज राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात एकूण चार सदस्य होते. यामध्ये तरुण चौहान, त्यांची आई, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश होता. "त्यांची पत्नी राजस्थानच्या सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात गेल्या होत्या. प्राथमिक तपासात दिसत आहे त्यानुसार, तरुण यांनी सर्वात आधी आई आणि मुलाला विष दिलं. यानंतर त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तपास सुरु आहे," असंही अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

शेजाऱ्यांनी सांगितलं आहे त्यानुसार, तरुण चौहान यांची आई गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. तसंच डोक्यावर कर्ज असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असाही दावा केला जात आहे. शेजाऱ्याने सांगितलं आहे की "ते नाराज का होते याची कल्पना नाही. तरुण यांनी काही दिवसांपूर्वी पेप्सीची डिलरशिप घेतली होती. यातून त्यांना फार मोठं नुकसान झालं होतं. यानंतर त्यांनी कर्ज फेडण्यासाठी घराचा एक भाग विकला होता. आता काय झालं आहे याची कल्पना नाही. पत्नी परत आल्यानंतरच नेमकं काय झालं ते समजू शकेल. तसंच पत्नी स्वत:हून गेली की पतीनेच मुद्दामून पाठवलं हेदेखील स्पष्ट होऊ शकलेलं नाही".

Read More