कर्नाटकातील गोकर्ण येथील रामतीर्थ टेकडीवरील एका दुर्गम आणि धोकादायक गुहेत रशियन महिला राहत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही महिलेसोबत तिच्या दोन लहान मुलीदेखील राहत असल्याचं आढळलं. गोकर्ण पोलीस गस्त घालत असताना त्यांना महिला जंगलात गुहेत राहत असल्याचं आढळलं.
९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गोकर्ण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर एसआर आणि त्यांचं पथक पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गस्त घालत होते. रामतीर्थ टेकडी परिसरात गस्त घालत असताना ही घटना उघडकीस आली. जंगलात शोध घेत असताना, त्यांना धोकादायक, भूस्खलन-प्रवण क्षेत्रात असलेल्या एका गुहेजवळ हालचाल दिसली. यानंतर त्यांनी पाहणी केली असता रशियन वंशाची नीना कुटिना (40) तिच्या दोन मुली प्रेमा (६ वर्षे, ७ महिने) आणि अमा (४ वर्षे) यांच्यासोबत गुहेत राहत असल्याचं आढळलं.
पोलिसांनी चौकशी केली असता, नीनाने दावा केला की ती आध्यात्मिक एकांत शोधण्यासाठी गोव्याहून गोकर्णला गेली होती. शहरी जीवनापासून दूर राहण्यासाठी ध्यान आणि प्रार्थना करण्यासाठी जंगलातील गुहेत राहणे पसंत केल्याचा तिने दावा केला आहे. महिलेने आपला हेतू चांगला असल्याचा दावा केला असला तरी अशा ठिकाणी मुलांच्या सुरक्षेबाबात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या गुहेत २०२४ मध्ये मोठं भूस्खलन झालं होतं आणि येथे विषारी सापांसह धोकादायक वन्यजीवांचे निवासस्थान आहे, ज्यामुळे ते धोकादायक ठिकाण बनले आहे.
महिलेचे समुपदेशन केल्यानंतर आणि तिला धोक्यांची माहिती दिल्यानंतर, पोलिस पथकाने कुटुंबाला यशस्वीरित्या वाचवले आणि त्यांना डोंगरावरून खाली नेले. महिलेच्या विनंतीनुसार, तिला कुमटा तालुक्यातील बंकीकोडला गावात ८० वर्षीय महिला भिक्षू स्वामी योगरत्न सरस्वती यांच्या आश्रमात हलवण्यात आले.