बंगळुरुत एका विद्यार्थिनीवर शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीवर फक्त शिक्षकच नाही तर त्यांच्या मित्रांनीही बलात्कार केला. विद्यार्थिनीवर एकदा नाही तर अनेक वेळा बलात्कार करण्यात आला. तसंच तिला ब्लॅकमेलही केलं जात असल्याचं समोर आलं आहे.
भौतिकशास्त्राचा शिक्षक नरेंद्र, बायोलॉजीचा शिक्षक संदीप आणि त्यांचा मित्र अनूप शहरातील एका खासगी महाविद्यालयात काम करतात. याच महाविद्यालयात पीडित मुलगी शिकत होती.
पोलीस तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, नरेंद्रने सर्वात प्रथम नोट्स शेअर करण्याच्या नावाखाली तिच्याशी ओळख करुन घेतली. यानंतर त्याने तिला सतत मेसेज करत मैत्री केली. एके दिवशी त्याने तिला अनुपच्या बंगळुरुमधील रुमवर बोलावून घेतलं. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसंच बलात्कार केल्यानंतर याबद्दल कुठेही भाष्य केल्यास परिमाण भोगावे लागतील असा इशारा दिला.
काही दिवसांनी संदीपने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तिने विरोध केला असता त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. माझ्याकडे तुझे आणि नरेंद्रचे फोटो, व्हिडीओ आहेत असं सांगत त्याने तिला सहकार्य करण्यासाठी धमकावलं. त्याने अनुपच्या निवासस्थानी तिच्यावर बलात्कार केला.
यानंतर अनुपने तिला घऱात प्रवेश करतानाचं सीसीटीव्ही दाखवत धमकावण्यास सुरुवात केली. त्याने तिला लैंगिक अत्याचार होत असल्याचा व्हिडीओदेखील दाखवला. पीडित विद्यार्थिनीने तिच्या पालकांना बंगळुरूला भेटायला गेल्यावर ही गोष्ट सांगितली. कुटुंबाने कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे संपर्क साधला आणि नंतर मराठाहल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दोन्ही शिक्षक आणि अनुप यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टातही हजर करण्यात आलं.