Marathi News> भारत
Advertisement

2 तास प्रयत्न करुनही ड्रम उघडेना, अखेर कापला असता पोलीस हादरले, आत चक्क...; पत्नी आणि प्रियकराला अटक

मेरठमधील एका घरामध्ये सिमेंटने भरलेल्या ड्रमात मृतदेह लपवलेला असल्याचं समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा मृतदेह मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या सौरभ राजपूतचा होता, ज्याची त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली.   

2 तास प्रयत्न करुनही ड्रम उघडेना, अखेर कापला असता पोलीस हादरले, आत चक्क...; पत्नी आणि प्रियकराला अटक

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका घरात सिमेंटने भऱलेल्या ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे असल्याचं समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा मृतदेह मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या सौरभ राजपूतचा होता, ज्याची त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे भरुन त्यावर टाकलं सिमेंट

सौरभची हत्या त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकून त्यात सिमेंट भरलं. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे सत्य उघड झालं. 2 तास प्रयत्न करुनही ड्रम उघडत नसल्याने पोलिसांनी तो ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम हाऊसला पाठवला. तिथे ड्रम कापून त्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. सिमेंट पक्कं झाल्याने मृतदेहदेखील त्यात अडकला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घराबाहेर लोकांनी गर्दी केली होती.

कुटुंबाचा विरोध पत्करुन केलं होतं लव्ह मॅरेज

मर्चंट नेव्हीत काम करणारा सौरभ राजपूत पत्नी मुस्कान रस्तोगी आणि 5 वर्षाच्या मुलीसोबत राहत असे. सध्या त्याची पोस्टिंग लंडनला होती. सौरभ काही दिवसांपूर्वी लंडनहून मेरठला आला होता. 2016 मध्ये त्याने लव्ह मॅरेज केलं होतं. यावरुन कुटुंबासह वादह सुरु होता. सौरभ तीन वर्षांपूर्वी पत्नीसह इंदिरानगर येथे भाड्याने घर घेऊन राहण्यास आला होता. 

सौरभ 4 मार्चला मेरठला आला होता. 10 दिवसांपूर्वी मुस्कानने शेजारच्या लोकांना की ती तिच्या पतीसोबत हिमाचल प्रदेशला जात असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून घराचा दरवाजा बंद होता. त्यानंतर कोणीही मुस्कान किंवा सौरभला पाहिलं नाही. दरम्यान, मुस्कानने तिच्या आईला संपूर्ण घटना सांगितली की तिने तिच्या प्रियकरासह सौरभची हत्या कशी केली. यानंतर, मुस्कानची आई पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी मुस्कानला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पत्नी मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून सौरभची हत्या केल्याचं समोर आलं. त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि नंतर सिमेंटचे द्रावण तयार करून ड्रममध्ये ओतण्यात आले. त्यामुळे मृतदेह आत गोठला आणि लोकांना त्याची माहिती होऊ नये म्हणून तो घरात लपवण्यात आला.

2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ड्रम कापण्यात आला

पोलिसांनी मुस्कानचा प्रियकर साहिल यालाही ताब्यात घेतलं आणि दोघांनाही घटनास्थळी आणले. सुमारे 30 मिनिटं सर्वजण आत होते, त्यानंतर पोलिसांनी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना पोलिस ठाण्यात नेलं. 2 तास प्रयत्न करूनही मृतदेह ड्रममधून बाहेर काढता आला नाही. अखेर पोलिसांनी मृतदेहासह ड्रम पोस्टमार्टम हाऊसमध्ये पाठवला आणि खूप मेहनत घेतल्यानंतर ड्रम कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या प्रकरणी मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम म्हणाले की, संध्याकाळी उशिरा ब्रह्मपुरी पोलिसांना इंदिरा नगरमध्ये एका हत्येची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास आणि चौकशी केली. पीडित सौरभ राजपूत असल्याचे आढळून आले जो मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता. तो 4 तारखेला त्याच्या घरी आला. तेव्हापासून त्यांना पाहिले नाही.

Read More