दिल्ली एका महिला आणि मुलाच्या हत्याकांडाने हादरली आहे. घरातील नोकराने महिला आणि तिच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. आरोपीने घराची मालकीण रुचिका सेननीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला आणि यानंतर पळ काढला. दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये ही घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपी नोकर मुकेश पासवान फरार झाला होता. पोलिसांनी चंदौलीच्या मुगलसरायमधून आरोपीला अटक केली आहे.
बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास रुचिकाचा पती कुलदीप कामावरुन घरी परतला असता दरवाजा बंद होता. त्याने आपली पत्नी आणि 14 वर्षीय मुलगा क्रिश यांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दोघांकडूनही काही प्रतिसाद मिळाला नाही. कुलदीपला गेट आणि पायऱ्यांवर रक्ताचे डाग दिसले होते. मनात शंका आल्याने त्याने पोलिसांना फोन केला आणि पत्नी, मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली.
पोलिसांनी दाखल झाल्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी 42 वर्षीय रुचिका घरात बेडच्या शेजारी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा संपूर्ण शर्टही रक्ताने माखलेला होता. तर मुलगा क्रिश बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात होता.
रुचिका आपल्या पतीसह लाजपत नगरमधील मार्केटमध्ये गारमेंट शॉप चालवत होती. पोलिसांनी आरोपी मुकेशला अटक केली आहे. मुकेश ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि दुकानातही मदतनीस होता. मुकेशने दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली आहे. रुचिका आपल्यावर ओरडल्याने तिची हत्या केल्याचं त्याने सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी चौकशी करत असून, हत्येचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
24 वर्षीय मुकेश बिहारचा असून, दिल्लीच्या अमर कॉलनीत वास्तव्यास होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत आहे. पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्हीदेखील तपासत आहे.