ADG Kundan Krishnan Statement: बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसताहेत. हत्या, गोळीबार आणि सुपारी किलिंगसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यात सीरियल मर्डरची प्रकरणं समोर आली आहेत. अशावेळी सर्व स्तरातून रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत सवाल उपस्थित होत आहेत. बिहार पोलिसांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वक्तव्य चर्चेत आहे.
ADG STF कुंदन कृष्णन यांनी एक अजब तर्क केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, बिहारमध्ये एप्रिल, मे आणि जूनमध्ये हत्येच्या घटना जास्त होतात. कारण या मोसमात शेतकऱ्यांकडे काही काम नसते. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांकडे काहीच काम नसते त्यामुळं गुन्हेगारीत वाढ होतात, असं कृष्णन यांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकरी शेतात व्यस्त होतात आणि खूनाच्या घटना घडतात. बेरोजगारी आणि रिकामटेकडेपणामुळं युवक पैशांसाठी सुपारी किलिंगसारख्या गुन्ह्यांकडे वळतात. ADG कुंदन कृष्णन यांनी असंही म्हटलं आहे की, हत्या संपूर्ण राज्यात होत असतात. मात्र निवडणुकांचा काळ असल्याने राजकीय पक्ष आणि मीडिया यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.
दरम्यान, ADG कुंदन कृष्णन यांच्या या वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची नाही का? शेतकरी आणि युवांवर गुन्ह्यांची जबाबदारी ढकलणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, एडीजीचं विधानावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
तेजस्वी यादव यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. असा तर्क आम्ही पहिल्यांदा ऐकतोय. आता स्वतः पोलिसांनीच मान्य केलंय की गुन्हे वाढताहेत आणि त्याचा दोष हवामानावर ढकलला जातोय. याचा अर्थ साफ आहे की, पोलिस अपयशी होत आहेत. हे विधान त्यांची लाचारी दर्शवतंय आणि हे स्पष्ट आहे की, मुख्यमंत्री नितीश कुमार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.