Ahmedabad Air India Plane Crash Pilot Conversation: गुजरातमधील अहमदाबाद येथे मागील महिन्यात एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. यासंदर्भात विमान दुर्घटना तपास ब्यूरोने शनिवारी 12 जुलै 2025 रोजी 15 पानांचा अहवाल जारी केला आहे. या अहवालामध्ये विमान अपघाताचं कारण समोर आलं आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांमध्ये इंजिनला इंधन पुरवणारे स्वीच बंद करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय. कॉकपीटमधील दोन वैमानिकांदरम्यान त्यावेळेस काय संवाद झालेला हे सुद्धा समोर आलं असून या संवादामधून अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
एनहान्स्ड एअरबॉर्न फ्लाइट रिकॉर्डरच्या आकडेवारीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांमध्येच रेकॉर्डींग बंद पडलं होतं. त्यानंतर तातडीने वैमानिकाने 'मे डे'चा अलर्ट पाठवला होता. या दरम्यान एअर ट्रॅफिक कंट्रोलरने कॉल साइनबद्दल विचारलं. त्यावर कोणतंही उत्तर विमानाच्या वैमानिकांकडून मिळालं नाही. त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलरला विमानाचा विमानतळाच्या बाहेरील सीमेजवळ अपघात झाल्याचं दिसलं.
या विमानाचे सारथ्य वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल आणि त्यांचे फर्स्ट ऑफिसर क्वाइव कुंदर करत होते. दोघेही अत्यंत अनुभवी होते. अङवालामध्ये दोन्ही वैमानिकांकडे पुरेसा अनुभव होता असं नमूद करण्यात आळं आहे. विमानाची तोडफोड झाली होती किंवा विमानात बाहेरुन काही नुकसान उड्डाणादरम्यान झाल्याचे पुरावे अद्याप तरी मिळालेले नाहीत. फ्लूअल स्वीचमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला होता. अहवालानुसार उड्डाण केल्यानंतर काही वेळानंतरच रॅम एअर टर्बाइन तैनात करण्यात आलं होतं. ड्युएल इंजिनमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक किंवा हायड्रॉलिक फेल्युअरच्या स्थितीमध्ये ही यंत्रणा वापरली जाते.
कॉकपीटमधील रेकॉर्डींगमध्ये एक वैमानिक दुसऱ्याला, "तू विमानाचं इंधन का थांबवलं?" असं विचारल्याचं ऐकू येत आहे. त्यावर दुसऱ्या वैमानिकाने मी असं काहीही केलेलं नाही असं उत्तर दिलं. या अहवालामध्ये विमानाचा इंधन पुरवठा बंद झाला, असं नमूद करण्यात आलं आहे. वैमानिकांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले, मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही आणि विमानाचा अपघात झाला. "जेव्हा विमान उड्डाण करत असतं तेव्हा इंधन नियंत्रित करणारा स्वीच हा कटऑफवरुन रनवर केला जातो. असं केल्यानेच इंजिन पूर्ण क्षमतेनं काम करुन उड्डाण करता येतं," असं अहवालात म्हटलं आहे. दोन्ही इंजिन वापरण्यासाठी फुल अथोरिटी डुएअल इंजिन कंट्रोलचा वापर केला जातो. ही यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने इंधनाचा वापर करुन उड्डाण भरण्यास मदत करते.
विमान उड्डाण करताना कोणत्याही पक्षांमुळे उड्डाणामध्ये अचडण आल्याचं दिसून आलं नाही, असं अहवालात म्हटलं आहे. विमानाने विमानतळाच्या सीमेवरील भिंत ओलांडण्यानंतर उंची गाठण्याऐवजी ते खाली येत गेलं, असंही अहवालात म्हटलंय.