Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत 265जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादचे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी ही माहिती दिती आहे. विमानामध्ये एकूण 242 जण प्रवास करत होते, त्यापैकी एक ब्रिटीश नागरिक चमत्कारीकरित्या बचावला आहे. एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कसा झाला? याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. एआय-171 विमानाचा अपघात पक्षी धडकल्यामुळं झाला नसावा, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, एअर इंडियाच्या जर विमान आणखी पुढे नेता आलं असतं तर अहमदाबाद-लंडनमधील प्रवाशांचा जीव वाचवता येऊ शकला असता.
तज्ज्ञांच्या मते, वैमानिकाने विमान ज्या पद्धतीने खाली आणले, ते पाहता विमान अखेरपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. हा प्रयत्न अनुभवी वैमानिकच करू शकतो. परंतु, ब्लॅक बॉक्समधून प्राप्त होणाऱ्या रेकॉर्डिंगच्या आधारे संपूर्ण सत्य समोर येईल. या घटनेनंतर काहींना 15 जानेवारी 2009 रोजीच्या यूएस एअरवेजच्या विमानाच्या अपघाताची आठवण झाली. यूएस एअरवेजच्या या ए३२० विमानाला पक्षी धडकल्यानंतर, वैमानिकाने ते हडसन नदीत उतरवले होते. या घटनेत कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाला नव्हता.
एअर इंडियाचे विमान-171 पुढे जाऊ शकले असते, तर ते साबरमती नदीत उतरवण्याचा प्रयत्न करता आला असता आणि प्रवाशांचे जीव वाचण्याची शक्यता वाढली असती. आपत्कालीन परिस्थितीत, जर विमान योग्यरीत्या उतरले तर ते काही काळ पाण्यात तरंगू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय.. या ब्लॅक बॉक्समुळे विमान अपघाताचं गूढ उलगडणार आहे... जेव्हा एखादे विमान कुठेही कोसळते, तेव्हा प्रथम अपघाताचे कारण शोधले जाते. विमान अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा तेथे पोहोचतात. विमान अपघातानंतर, त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू ठरते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 8 वाजता अहमदाबादला पोहचणार आहेत. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा ते आढावा घेणार आहेत. यावेळी ते अहमदाबाद विमानतळा शेजारच्या अपघात स्थळाला भेट देणार असून सिव्हिल रुग्णालयातही जाणार आहेत.काल अपघात होताच पंतप्रधानांच्या निर्देशानंतर केंद्रीय उड्डयन मंत्री आणि केंद्रिय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसह घटनास्थळाचा आणि सिव्हील रुग्णालयाचा आढावा घेतला होता.