Marathi News> भारत
Advertisement

...आणि कोरोना रिपोर्टची प्रतिक्षा न करताच डॉक्टरांनी वाचवला शेतकऱ्याचा जीव

कोरोना संशयित शेतकऱ्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती त्यांना मिळाली

...आणि कोरोना रिपोर्टची प्रतिक्षा न करताच डॉक्टरांनी वाचवला शेतकऱ्याचा जीव

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून Coronavirus कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांवर कमालीचा तणाव आला आहे. एकिक़डे सातत्यानं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा तर, दुसऱ्या ठिकाणी इतर आजारांसाठी रुग्णांना दिली जाणारी सेवा या साऱ्यामध्ये आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाचीच दमछाक होत आहे. पण, त्यांचं कार्य मात्र अविरतपणे सुरुच आहे. याच परिस्थितीत आता सर्वसामान्यांच्या नजरेत या माणसातील देवाचं महत्त्वं लक्षणीयरित्या वाढलं आहे. त्याचा प्रत्यय आता आणखी एका घटनेतून दिसून येत आहे.

'इंडियन एक्सप्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एम्स मधील डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळं एका कोरोना संशयित शेतकऱ्याचा जीव वाचला आहे. गुरुवारी एम्स रुग्णालयाच्या आपात्कालीन विभागाला एक संदेश मिळाला. ज्यामध्ये बिहारमधील एका ३५ वर्षीय कोरोना संशयित शेतकऱ्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती त्यांना मिळाली. 

रात्री साडेदहा वाजण्याच्या सुरमारास सदर इसमाला त्याच्या भावाने रुग्णालयात आणलं होतं. त्यावेळी असह्य वेदनांनी त्याला वेढा घातला होता. प्रत्येक मिनिटासोबतच त्याची प्रकृती खालावत होती. जे पाहता, तासाभरातच डॉक्टरांचीएक टीम तयार करण्यात आली. ज्यांनी गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रीया करत त्याचे प्राण वाचवले. 

परिचारिका, डॉक्टर, ऑपरेशन थिएटर टेक्निशिअर, दोन ऍनेस्टेशिस्ट्स अशा मंडळींनी एकत्रित येत अथक प्रयत्नांनी अतिशय कठीण प्रसंगातही ही शस्त्रक्रिया पार पाडली. अपेंडीक्स फुटल्यामुळे, आतड्यांना झालेल्या छिद्रामुळे रुग्णाला या वेदना होत होत्या. मुख्य म्हणजे तो कोरोना संशयित होता. पण, त्याच्या चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा करण्यापूर्वीच त्याची एकंदर गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर पुढे गुरुवारी या रुग्णाच्या कोरोना चाचणीचा अहवालही निगेटीव्ह आल्याचं सांगण्यात आलं. 

 

'त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्याला कफ, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. ही सगळी कोरोनाची लक्षणं त्याच्यामध्ये दिसून आली होती. पण, या परिस्थितीमध्ये त्याच्या चाचणीसाठीच्या अहवालाची प्रतिक्षा करणं म्हणजे त्याचा जीव धोक्यात टाकण्यासारखं झालं असतं, अशी माहिती ऍनेस्थेशिया विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सिंह यांनी दिल्याचं वृत्त 'इंडियन एक्सप्रेस'ने प्रसिद्ध केलं.

कोरोनाबाधित किंवा संशयितांवर य़उपचार करतेवेळी डॉक्टरांपुढेही काही अडचणी असतात. पण, या साऱ्यामध्येही रुग्णाचे प्राण हेच सर्वतोपरी महत्त्वाचे असल्याची भावना या शेतकऱ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केली आणि पुन्हा एकदा या माणसातील देवाचं देवत्वं सिद्ध झालं, असं म्हणायला हरकत नाही. 

 

Read More