Ahmedabad Plane Crash: 12 जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान दुर्घटनेत (Air India Plane Crash) अनेक लोक मृत्यमुखी पडले. मृतांचं शरीर अक्षरशः जळून गेले आहे. यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड झालं आहे. यासाठी मृतांच्या नातेवाईकांचा DNA घेऊन चाचणी करून मृतदेह देण्यात येत आहेत. आता मृतांच्या नातेवाईकांपर्यंत त्यांचे पार्थिव पोहोचवण्यासाठी तयारीला वेग आला आहे. या भीषण दुर्घटनेत 241 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लंडनला जाणारी एअर इंडिया फ्लाइट AI-171 टेकऑफनंतर काही क्षणांतच मेघाणीनगरमधील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे.
एजन्सीच्या अहवालानुसार, एअर इंडियाने अचानक वडोदरा येथील शवपेटी निर्माता नेल्विन राजवाडी यांना फोन केला आणि त्यांना 100 शवपेटी बनवण्याचा ऑर्डर दिली. मृतदेहांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत सुरक्षितपणे पाठवण्यासाठी तातडीने शवपेट्यांची गरज निर्माण झाली. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने वडोदऱ्यातील कॉफिन मेकर नेल्विन रजवाडी यांना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक फोन करून सांगितलं, "आम्हाला लवकरात लवकर 100 शवपेट्या हव्यात."
नेल्विन गेली 30 वर्षं हे काम करत असून 'ऑल इंडिया अॅम्बुलन्स सेवा' देखील चालवतात. त्यांनी सांगितलं की, "एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात शवपेट्या बनवणं खूपच कठीण होतं, पण वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही थांबलोच नाही. काम तातडीने सुरू केलं."
शनिवार सकाळपासून नेल्विन आणि त्यांची टीम दिवसरात्र झटत आहेत. मेथोडिस्ट चर्चचे फादर यांनी जागा आणि आवश्यक साहित्य, विशेषतः पांढरं कापड, उपलब्ध करून दिलं. सातहून अधिक लोकांच्या मदतीने शवपेट्यांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. नेल्विन म्हणतात, "एक काटाही बोचला तर पाच दिवस दुखतो. त्या कुटुंबांची काय परस्थिती असेल ज्यांनी आपले आप्त गमावले."
नेल्विन यांनी हे काम केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर मानवतेची आणि देशभक्तीची जबाबदारी म्हणून स्वीकारलं आहे. आत्तापर्यंत 25 शवपेट्या तयार झाल्या असून त्या एअर इंडियाच्या विशेष फ्लाइटमधून अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहेत. उर्वरित शवपेट्याही लवकरच तयार होतील, असं नेल्विन यांनी सांगितलं.