दिल्लीहून कोलकाताला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला धावपट्टीवरून उड्डाणासाठी वेग वाढवत असतानाच तांत्रिक बिघाड आढळून आला. यानंतर वैमानिकांनी ताशी 155 किमी वेगाने धावणाऱ्या विमानाचे ब्रेक दाबले आणि थांबवलं. विमान AI2403 संध्याकाळी 5.30 वाजता कोलकात्यासाठी उड्डाण करणार होतं. परंतु तांत्रिक समस्या आढळून आल्याने वैमानिकांनी नियमांचं पालन करत उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला.
विमान कंपनीने निवेदन जारी करत म्हटलं आहे की, "21 जुलै 2025 रोजी दिल्लीहून कोलकाताला जाणारे विमान AI2403 आज संध्याकाळी उशिरा उड्डाण करेल. उड्डाणादरम्यान तांत्रिक समस्या आढळून आली होती. कॉकपिट क्रूने नियमानुसार उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला."
"सर्व प्रवासी उतरले आहेत आणि दिल्लीतील आमचे ग्राउंड सहकारी त्यांना मदत करत आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. एअर इंडियामध्ये, आमच्या प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे," असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.
एअर इंडियाच्या विमानाबाबत सोमवारी घडलेली ही दुसरी घटना आहे. मुंबईत, कोचीहून येणारे एक विमान पावसाने भिजलेल्या धावपट्टीवरून घसरलं. फोटोंमध्ये विमानाच्या मागील भागात गवताचा ढिगारा अडकला असून, एका इंजिनचं नुकसान झाल्याचं दिसून आलं. धावपट्टीचंही नुकसान झालं आहे. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान गेल्या सहा महिन्यांत सुरक्षा उल्लंघनांच्या संदर्भात एअर इंडियाला नऊ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.