IT woman arrested bomb hoax: एअर इंडिया विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरातील दु:खाचं वातावरण होतं. ही घटना नेमकी कशी घडली? यामध्ये कोणाची चूक होती? याचा तपास सुरु आहे. विमानातील ब्लॅक बॉक्सची तपासणीदेखील सुरु आहे. यात कोणता घातपात झालाय का? यादृष्टीनेदेखील तपास सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक ईमेल येतो, ज्यात मीच प्लेन क्रॅश केलं, असं लिहिलेलं असतं. यामुळे गुजरात पोलीस अलर्ट मोडवर जातात. याचा तपास सुरु होतो आणि हळुहळू धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतो. काय आहे हा प्रकार? जाणून घ्या. जोशिलदा नावाची ही महिला चेन्नईतील एका मोठ्या आयटी कंपनीत काम करायची. या मुलीने धमकीचे ईमेल पाठवून 12 राज्यांच्या पोलिस विभागात दहशत आणि गोंधळ निर्माण केला होता. या मुलीने 12 राज्यांमध्ये बॉम्बस्फोटाचे धमकीचे ईमेल पाठवले होते. याचे कारण समजल्यावर तुम्हाला धक्का बसेल.
या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका पुरूषावर तिचे मनापासून प्रेम होते, पण त्या पुरूषाने दुसऱ्याशी लग्न केल्याचे तिला कळले आणि तिचा भ्रमनिराश झाला. तिचे मन तुटले आणि तिने बदला घ्यायचे ठरवले. काहीही झालं तरी त्या पुरूषाचा नाश करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे तिने ठरवले. फिस्कटलेल्या प्रेमाचा बदला घेण्यासाठी तिने तंत्रज्ञानाचा आधार घेतला. असा कट रचला की संपूर्ण देशात दहशत पसरू लागली.
जोशिलदा ही एक सामान्य महिला नव्हती. ती तांत्रिकदृष्ट्या खूप हुशार होती. तिचे खरे नाव लपवण्यासाठी तिने व्हीपीएन, व्हर्च्युअल नंबर आणि बनावट मेल आयडी सारख्या सायबर तंत्रांचा वापर केला. इतकेच नव्हे तर ती असे मेल पाठवत होती की जणू काही दुसराच पुरूष ते पाठवतोय, असा भ्रम निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली. त्या पुरूषाची बदनामी करणे आणि त्याला कायदेशीर अडचणीत आणणे, हा तिचा उद्देश होता. पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक करतोच आणि सर्व काही बिघडते. जोशिलदाने मेल पाठवताना एक छोटीशी तांत्रिक चूक केली. या चुकीमुळे पोलिसांना तिच्याबद्दल माहिती मिळाली आणि तिला चेन्नईतून अटक करण्यात आली.
जोशिल्डाने गेल्या एका वर्षात 21 हून अधिक मेल पाठवले, ज्यामध्ये देशातील अनेक शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि स्टेडियमवर बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. हे मेल गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान सारख्या राज्यांना पाठवण्यात आले होते. 13 जून रोजी अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजला तिने मेल पाठवला. यात 'एअर इंडियाचे विमान क्रॅश केल्याचे ती म्हणाली. 'तुम्हाला आमची धमकी विनोद वाटली. आता तुम्हाला कळले की आम्ही किती गंभीर आहोत.' असे तिने ईमेलमध्ये लिहिले. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली.
जोशिल्डाचा वेडेपणा इथेच संपला नाही. तिने स्वतःचे आणि त्या पुरुष सहकाऱ्याचे बनावट विवाह प्रमाणपत्र बनवले. आम्ही दोघे विवाहीत आहोत, अशी बातमी ऑफिसमधील लोकांमध्ये पसरवली.त्या पुरुषाशी बोलणाऱ्या महिला सहकाऱ्यांनाही ती घाबरवत असे. तिला कंटाळून एका महिलेने निराशेतून नोकरीही सोडली होती.
अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांनी जोशिलदाकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बनावट ईमेल अकाउंट आणि इतर डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचाही तपास पोलीस आता करत आहेत. 9 जून रोजी गुजरात उच्च न्यायालयाला मिळालेल्या बॉम्ब धमकीच्या मेलमागे जोशिलदा किंवा तिच्या सहकाऱ्यांपैकी एकाचा हात असल्याचा संशय आहे.