Air India plane Crash: 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघाताने देश हादरला. त्यात 275 जणांना आपले प्राण गमवावे लागले. भारतीय सुरक्षा संस्था या अपघाताची चौकशी करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. उच्च गुप्तचर सूत्रांच्या मते, दुर्मिळ अशा दुहेरी इंजिन बिघाडाची घटना लक्षात घेऊन कटाच्या सात संभाव्य कोनांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इंधन छेडछाड, सुरक्षा त्रुटी आणि तांत्रिक त्रुटी यासारख्या पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे. ही चौकशी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या धोरणावर आधारित आहे. जेणेकरून प्रत्येक संभाव्य धोका दूर करता येईल. CNN-News18 ने यासंदर्भात वृत्त दिलंय
12 जून रोजी एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI 171 ने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले.पण पुढच्या 40 सेकंदात ते गर्दीच्या ठिकाणी कोसळले. या अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी फक्त एक ब्रिटिश-भारतीय प्रवासी वाचला. तो प्रवासी 11A क्रमांकाच्या सीटवर बसला होता. सुरुवातीच्या अहवालांमध्ये दुहेरी इंजिन बिघाड किंवा हायड्रॉलिक/इलेक्ट्रॉनिक सिस्टम बिघाड झाल्याचा संशय आहे.
अपघातानंतर सापडलेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा दिल्लीतील AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे आणि त्याची सविस्तर चौकशी सुरू आहे. तपास संस्था 7 प्रमुख पैलूंवर लक्ष केंद्रित करत आहेत. पहिले, इंधन साखळीत छेडछाड होण्याची शक्यता, ज्यामध्ये विमानतळावरील इंधन पुरवठा किंवा गुणवत्तेत फेरफार समाविष्ट असू शकतो. दुसरे, सुरक्षा प्रोटोकॉलमधील त्रुटी, ज्यामध्ये बोर्डिंग प्रक्रियेत किंवा सामान तपासणीत निष्काळजीपणाचा संशय आहे. तिसरे सायबर हल्ल्याचा कोन, ज्यामध्ये विमानाची इलेक्ट्रॉनिक प्रणाली हॅक होण्याची शक्यता समाविष्ट आहे. चौथे तांत्रिक दोष, ज्यामध्ये इंजिन किंवा इतर भागांमधील उत्पादन दोषांची चौकशी केली जात आहे. पाचवे, अंतर्गत तोडफोड, ज्यामध्ये क्रू किंवा ग्राउंड स्टाफचा सहभाग तपासला जात आहे. सहावे, बाह्य दहशतवादी कट, ज्यामध्ये विमानाला लक्ष्य करण्याची योजना समाविष्ट असू शकते. सातवे, मानवी चूक, ज्यामध्ये पायलट किंवा नियंत्रण टॉवरची चूक तपासली जात आहे.
एअर इंडियाच्या या अपघाताने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे. भारत लवकरच तपासाचे निकाल जगासमोर आणेल, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (एनटीएसबी) प्रमुख जेनिफर होमंडी यांनी म्हटलंय. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या विमान वाहतूक तपासकर्त्याला प्रवेश नाकारला आहे. ज्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. तपास पूर्ण पारदर्शकतेने सुरू आहे आणि कोणताही निकाल येईपर्यंत अंदाज लावणे योग्य ठरणार नाही, असे भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
क्रॅश झालेल्या विमानाची नियमित सुरक्षा तपासणी करण्यात आली होती. 4 महिन्यांपूर्वी उजवे इंजिन बदलण्यात आले होते आणि एप्रिल 2025 मध्ये डावे इंजिन तपासण्यात आले होते, असा दावा एअर इंडियाने केलाय. पण तज्ञांच्या माहितीनुसार, दुहेरी इंजिन बिघाड हे गंभीर असून ते हलके घेतले जाऊ शकत नाही. विमानाच्या मागील कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असताना उड्डाणापूर्वी विमानाला तपासणीसाठी थांबवण्यात आले पाहिजे होते, असे काही अहवालांमध्ये सुचवण्यात आले आहे.
भारतीय विमानांना लक्ष्य करण्याच्या धमक्या यापूर्वीही मिळाल्या आहेत. या घटनेने भारतीय विमान वाहतूक क्षेत्राच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार संपूर्ण एअर इंडिया बोईंग फ्लीटचे सुरक्षा ऑडिट करण्याचा विचार करत आहे. यासोबतच विमानतळांवर इंधन आणि सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेचा दहशतवादी कारवायांशी संबंध असू शकतो का? यावरही गुप्तचर संस्था लक्ष ठेवून आहेत.