Ajit Pawar Setback: महाराष्ट्रात शरद पवरा आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट येणार असल्याची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राष्ट्रीय पातळीवर मोठा झटका बसला आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. 7 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. एकाच वेळी 7 आमदार NDPP पक्षात विलीन झाले आहेत.
अजित पवारांची साथ सोडणारे हे आमदार नागालँडचे आहेत. नागालँडमधील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) तब्बल 7 आमदार थेट सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये (NDPP) विलीन झाले आहेत.
एकाचवेळी साथ आमदारांनी थटे पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील त्यांचे विरोधी पक्ष म्हणून असलेले बळ अचानकपणे कमी झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रावदीचे हे सात आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सरकारची बहुमताची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष शेरिंगेन लॉन्गखुमर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व सात आमदारांनी स्वतः हजर राहून एनडीपीपीमध्ये विलीन होण्याचा निर्णय सांगणारी औपचारिक पत्रे सादर केली. त्यांनी सांगितले की हे विलीनीकरण संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक आवश्यकता पूर्ण करते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या एनडीडीपीमध्ये प्रवेशाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांना त्यांच्या भागात काम करू दिले जात नाही. या सात आमदारांसोबत दोन महिन्यांपूर्वी एक बैठक झाली होती. यावेळी आमदारांनी म्हटले होते की, 'आमचे काम होत नाहीये, आम्हाला समस्या येत आहेत. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणून, त्यांनी सत्ताधारी एनडीडीपीमध्ये काम करणे निवडले असे अजित पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर, नागालँड युनिटने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला पाठिंबा दिला होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत, एनडीपीपी आणि त्यांचा मित्रपक्ष भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. यावेळी राष्ट्रवादीने 12 जागा जिंकल्या.