Marathi News> भारत
Advertisement

भारतात कॉफीची लागवड पहिल्यांदा कुठे झाली? आनंद महिंद्रांनीच माहिती देत दाखवलं एक अविश्वसनीय ठिकाण

Anand Mahindra : खुद्द आनंद महिंद्रा यांना भावलेल्या या पर्यटनस्थळी एकदा भेट द्यायलाच हवी... पाहून तुम्हीही असंच म्हणाल. पाहा कुठंय हे ठिकाण...   

भारतात कॉफीची लागवड पहिल्यांदा कुठे झाली? आनंद महिंद्रांनीच माहिती देत दाखवलं एक अविश्वसनीय ठिकाण

Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा अशी ओळख असणाऱ्या आणि भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्या सोशल मीडिया अकाऊंटची नेहमीच या न त्या कारणानं चर्चा पाहायला मिळते. महिंद्रा नेमकं काय आणि कोणत्या विषयावर बोलतात इथपासून त्यांनी उल्लेख केलेल्या एखाद्या ठिकाणापर्यंतसुद्धा कमाल चर्चा होते. 

काही दिवसांपूर्वीच त्यांनी X च्या माध्यमातून एक अशी पोस्ट केली होती, जिथं त्यांनी एका निसर्गरम्य ठिकाणाचा फोटो शेअर केला आणि त्या ठिकाणाची अनेकांना ठाऊक नसणारी माहितीसुद्धा दिली. महिंद्रांना भावलेलं हे ठिकाण म्हणजे, कर्नाटकातील चिकमंगळुरू. 'अनपेक्षित ठिकाणांवरच गूढ गुपितांचा उलगडा होतो. हे तेच ठिकाणही आहे जिथं साधारण 1670 च्या सुमारास बाबा बुदान नावाच्या व्यक्तीनं कॉफीची रोपं लावली होती. ही रोपं येमेनहून आणली गेल्याचं म्हटलं गेलं.' महिंद्रा यांनी असं कॅप्शन लिहीत चिकमंगळुरूच्या निसर्गाची झलक दाखवणारा एक अप्रतिम फोटो शेअर केला आणि बस्स... मग काय? सोशल मीडियावर अनेकांनीच या फोटोला पसंती देत या ठिकाणी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. 

चिकमंगळुरूला येऊन 'ही' ठिकाणं पाहाच...

चिकमंगळुरू एक उत्तम गिरीस्थान असून, येथील कॉफीसाठी हे ठिकाण प्रचंड लोकप्रिय आहे, इथं अनेक कॉफीच्या लागवड क्षेत्रांमध्ये फेरफटका मारण्याची संधी पर्यटकांना दिली जाते. स्थानिकांकडूनच इथं Coffee Plantation मध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करून देणारे Tourist Packages उपलब्ध करून दिले जातात. इथं भेट दिली असता ओढे, नद्या, पर्वत, डोंगररांगा आणि मंदिरं पाहण्याजोगी आहेत. 

चिकमंगळुरूला आलं असता मुल्लायनगिरी पर्वत, हेब्बे ओढा, बाबा बुदन गिरी, भद्रा वन्यजीव अभयारण्य, कॉफी संग्रहालय या ठिकाणांना आवर्जून भेट देण्याचा सल्ला पर्यटकांना दिला जातो. या ठिकाणी असणाऱ्या वनसंपदेमध्ये अनपेक्षित जैवविधीता आढळते इतकंच नव्हे, तर इथं हवेत एक सुखावणारा गारठासुद्धा जाणवतो. या भागात आलं असता इथं स्थानिक खाद्यसंस्कृती अनुभवण्याला अनेकजण पसंती देतात. 

Read More