Marathi News> भारत
Advertisement

डोंगर कापून उभारला आलिशान संगमरवरी महाल; माजी मुख्यमंत्र्यांचं 500 कोटींचं घर वादात

Viral Video : माजी मुख्यमंत्र्यांचा आलिशान महाल नेमका कसा आहे? आतून कसं दिसतंय हे भव्य घर? कोणाच्या नावे याची मालकी? पाहा...   

डोंगर कापून उभारला आलिशान संगमरवरी महाल; माजी मुख्यमंत्र्यांचं 500 कोटींचं घर वादात

Video : राजकारणात नेतेमंडळींची कारकिर्द जितकी चर्चेचा विषय ठरते तितकंच त्यांचं खासगी आयुष्य, एकंदर कमाई हे सर्व मुद्देसुद्धा प्रचंड चर्चेच असतात. याच राजकारणात आता एका बड्या नेत्याच्या घरानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. महाकाय डोंगर कापून उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या या घराचे व्हिडीओ थेट वृत्तसंस्थेनंच प्रसिद्ध केल्यामुळं आता विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 

विशाखापट्टणमच्या ऋषिकोंडा इथं समुद्राला लागूनच असणाऱ्या एका डोंगराचा काही भाग, कडेकपारी तासत तिथं पुरेशी जागा तयार करत डोंगरउतारावरच हा आलिशान महाल उभारण्यात आला असून, त्याची मालकी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येतं. जवळपास 10 एकरांच्या भूखंडावर साधारण 500 कोटींची रक्कम खर्ची घालत हा शुभ्र महाल उभारण्यात आला असून, रेड्डी यांचं हे घर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. नियमांची पायमल्ली करत रेड्डी यांचा हा आलिशान निवास उभा असल्याचं म्हटलं जातं. 

ANI या वृत्तसंस्थेनं या घराच्या आतील व्हिडीओ जारी केला असून, यामध्ये घराचे अंतरंग अतिशय शुभ्र छटेमध्ये दिसत असून, तिथं असणारं फर्निचर, मोठाले झुंबर नजर खिळवून ठेवत आहेत. बाथटब म्हणू नका, बागबगिचा म्हणू नका किंवा भलंमोठं वाहनतळ म्हणू नका, जे म्हणाल ती सुविधा इथं उपलब्ध असल्याचं काही मिनिटांचा हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं. 

काय आहे या महालवजा घराचं महत्त्वं? 

सूत्रांच्या माहितीनुसार हे महालवजा घर 10 एकरांच्या भूखंडावर 4 मोठ्या ब्लॉकमध्ये उभं आहे. या घराचे अंतरंग तयार करण्यासाठी आणि सजावटीसाठी इटालियन संगमरवराचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जाते. ऋषिकोंडा या नावानं हे घर ओळखलं जात असून YSR काँग्रेसच्या काळात हे मुख्यमंत्री रेड्डी यांचं निवासस्थान आणि कार्यालय होतं. या परिसरात हाकेच्या अंतरावरच पक्के रस्ते, वीजेची उपकेंद्र आणि पाण्याची उत्तम सुविधा आहे. 

घर वादाच्या भोवऱ्यात 

आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टी अर्थात टीडीपीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या भल्यामोठ्या घराला हेरलं आणि याच्या निर्मितीसाठी तत्कालीन रेड्डी सरकारनं पैशांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला. हा आलिशान राजवाडा बांधण्यासाठी ऋषिकोंडाचा डोंगर पोखरण्यात आला असून, तिथं हे बांधकाम केल्याचा आरोपही रेड्डींवर लावण्यात येत आहे. 

नायडू यांच्या आरोपानुसार रेड्डी यांनी सार्वजनिक निधीचा दुरूपयोग केला असून वायएसआरसीपीच्या माजी मंत्र्यांनी मात्र रेड्डींच्या या बंगल्यावरून होणारे आरोप पाहता बचावात्मक स्पष्टीकरण देत हे बांधकाम कायदाच्या चौकटीत राहूनच केल्याचं स्पष्ट केलं. 

Read More