Gyanvapi Survey: उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील (Varanasi) ज्ञानवापी मशीद परिसरात आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या (ASI) सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. एएसआयच्या पथकाने सकाळी 7 वाजता ज्ञानवापी परिसरात पोहोतच सर्वेक्षण सुरु केलं. एएसआयला 4 ऑगस्टपर्यंत रिपोर्ट जिव्हा न्यायालयात सादर करायचा आहे. न्यायमूर्ती ए के विश्वेश यांनी शुक्रवारी मशीद परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. दुसरीकडे मुस्लीम पक्षांनी निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
एएसआय पथक सर्व उपकरणांसह ज्ञानवापी मशिदीत दाखल झालं आहे. एएसआयच्या पथकात एकूण 43 सदस्य आहेत. यावेळी त्यांच्यासह 4 वकीलही आहेत. प्रत्येक पक्षकाराचा एक वकील ज्ञानवापी परिसरात आहे. याशिवाय याचिकाकर्त्या चार महिलाही मशिदीत उपस्थित आहेत.
#WATCH | Varanasi, UP: ASI (Archaeological Survey of India) to conduct survey of the Gyanvapi mosque complex today
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 24, 2023
Visuals from outside the Gyanvapi premises pic.twitter.com/VrvywzKp99
सूत्रांच्या माहितीनुसार, एएसआयनेच चार वेगवेगळ्या टीम तयार केल्या असून, सर्वांनी सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. चारही पथकं वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षण करत आहेत. ज्यामध्ये पश्चिमेकडील भिंतीजवळ एक पथक, घुमटासाठी एक पथक, मशिदीच्या व्यासपीठासाठी एक पथक आणि परिसराच्या सर्वेक्षणासाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासह खोदकाम करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. पण खोदकाम करताना बांधकामाला कोणताही धक्का लागता कामा नये अशी अट आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये पाच महिलांनी वाराणसीच्या सिव्हिल जजसमोर एक याचिका दाखल केली होता. यामध्ये त्यांनी ज्ञानवापी मशिदीच्या शेजारी उभ्या असणाऱ्या श्रृंगार गौरी मंदिरात रोज पूजा करण्याची आणि दर्शनाची परवानगी मागितली होती.
महिलांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर यांनी मशीद परिसराचं सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. कोर्टाच्या आदेशानंतर तीन दिवस सर्वेक्षण झालं होतं. यानंतर हिंदू पक्षकारांनी तिथे शिवलिंग सापडल्याचा दावा केला होता. मशिदीच्या वजुखान्यात शिवलिंग आहे असा दावा करण्यात आला होता. पण मुस्लिम पक्षकारांनी हे शिवलिंग नसून, पाण्याचा फवारा असल्याचं सांगितलं होतं.
यानंतर हिंदू पक्षकारांनी संबंधित जागा सील करण्याची मागणी केली होती. सेशन कोर्टाने ही जागा सील करण्याचा आदेश दिला होता. याविरोधात मुस्लिम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, कोर्टाच्या आदेशानुसार आता एएसआयचं पथक मशीद परिसराचं सर्वेक्षण करत आहे. पण एएसआय वजूखान्याचं सर्वेक्षण करणार नाही, जिथे शिवलिंग सापडल्याचा दावा आहे. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू जैन यांनी सर्वेक्षणात ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल असं स्पष्ट केलं आहे.
हिंदू बाजूने दावा केला आहे की मशिदीच्या संकुलातील मधल्या घुमटाच्या खाली जमिनीतून जोरात आवाज येतो. खाली एक मूर्ती असू शकते, जी कृत्रिम भिंतीच्या खाली झाकण्यात आली आहे असा दावा आहे. एएसआय सील करण्यात आलेली जागा वगळता संपूर्ण परिसराचं सर्वेक्षण करणार आहे.
ज्ञानवापीचं सर्वेक्षण करण्यास 3 ते 6 महिने लागू शकतात. अयोध्या राम मंदिराचं 2002 मध्ये एएसआय सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यावेळी तीन वर्षात रिपोर्ट सादर करण्याचा आदेश होता. अयोध्येप्रमाणे ज्ञानवापीचा परिसरही मोठा असून, त्यासाठी वेळ लागू शकतो.