सध्या देशभरात मेरठ हत्याकांडाची चर्चा सुरु आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन मृतदेह ड्रममध्ये लपवला होता. यावर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा व्यक्त झाले आहेत. महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याच्या प्रकरणात संगोपनातील त्रुटी दिसून येते आणि कुटुंबांनी त्यांच्या मुलांमध्ये योग्य संस्कार सुनिश्चित करण्यासाठी श्री रामचरितमानसच्या शिकवणींचं पालन केले पाहिजे, असं धार्मिक उपदेशक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांनी बागेश्वर बाबा यांना मेरठ हत्याकांडाबद्दल विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "सध्या भारतात निळा ड्रम प्रसिद्ध आहे आणि अनेक पतींना धक्का बसला आहे". आरोपींनी वापरलेल्या निळ्या ड्रमचा संदर्भ देत ते बोलत होते. पीडित सौरभ राजपूतची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ड्रममध्ये भरण्यात आले होते. यानंतर त्यावर सिमेंट टाकण्यात आलं होतं. 'बरं झालं माझं लग्न झालेलं नाही,' असं बागेश्वर बाबांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे.
"मेरठची घटना दुर्दैवी आहे. कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास, पाश्चात्य संस्कृतीचे आगमन आणि विवाहित पुरुष किंवा महिलांचे संबंध यामुळे कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. यावरून मूल्यांचा अभाव दिसून येतो. जर कोणाचा मुलगा किंवा मुलगी अशी कृत्ये करत असेल तर याचा अर्थ संगोपनाचा अभाव आहे. म्हणून, सुसंस्कृत कुटुंब निर्माण करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने श्री रामचरितमानसची मदत घेतली पाहिजे," असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.
सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना त्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांनी शरीराचे 15 तुकडे करून ओल्या सिमेंटने ड्रममध्ये बंद केले होते. तपासात मुस्कान आणि साहिल यांना ड्रग्जचं व्यसन असल्याचं उघड झालं आहे. सौरभ त्यांचं नातं संपवेल अशी त्यांना भिती होती. लंडनमध्ये काम करणारा सौरभ त्याच्या सहा वर्षांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी आला होता तेव्हा त्याची हत्या करण्यात आली.
मुस्कानने तिच्या पालकांसमोर कबुली दिल्यानंतर हा भयानक गुन्हा उघडकीस आला आणि त्यांनी तिला पोलिस ठाण्यात नेले. हे दोघे सध्या मेरठ तुरुंगात आहेत.