RBI on ₹500 note : भारतीय चलनव्यवस्थेमध्ये 2016 मध्ये एक नवा आणि तितकाच मोठा आणि अनेकांसाठीच अनपेक्षित बदल आला. हा बदल होता केंद्र शासनाच्या एका निर्णयाचा आणि हा निर्णय होता नोटबंदीचा. 8 नोब्हेंबर 2016 ला केंद्र शासनानं नोटबंदीची घोषणा करत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.
देशाच्या अर्थव्यवस्थेसह सामान्यांवर परिणाम करणाऱ्या या निर्णयानंतर केंद्र सरकारनं 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. त्यामागोमागच 10, 50 रुपयांच्याही नव्या नोटा वापरात दिसू लागल्या. या निर्णयानंतर काही वर्षांनीच मोदी सरकारनं पुन्हा असाच एक निर्णय घेत 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर देशाच्या चलनव्यवस्थेमध्ये सर्वाधिक मूल्याची नोट म्हणून सध्यातरी फक्त 500 रुपयांचीच नोट वापरात आहे.
2000 रुपयांच्या नोटेचा वापर बंद झाल्यानंतर देशात जिथंतिथं मोठ्या व्यवहारांमध्येही 500 रुपयांच्याच नोटा दिसू लागल्या. मात्र आता या नोटासुद्धा चलनातून बाद होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. 30 सप्टेंबर 2025 नंतर 500 रुपयांच्या नोटा आरबीआयकडून जारी करण्यात येणार नाही असंही म्हटलं जात असल्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत आहे. किंबहुना Whats App वरही त्यासंदर्भातील काही मेसेज व्हायरल होत आहेत.
खरं काय आणि खोटं काय?
सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये दावा केल्यानुसार आरबीआयकडून 30 सप्टेंबर 2025 पासून एटीएमच्या माध्यमातूनही 500 रुपयांच्या नोटा दिल्या जाणार नसून, प्राथमिक स्तरावर आरबीआय देशातील एकूण चलनातून 75 टक्के 500 रुपयांच्या नोटा बाद करण्याचं लक्ष्य ठेवणार असून, त्यानंतर 31 मार्ट 2026 पर्यंत हा आकडा 90 टक्क्यांपर्यंत नेला जाणार आहे. मेसेजमधील दाव्यानुसार एटीएममधून फक्त 200 आणि 100 च्याच नोटा काढता येणार आहेत.
Has RBI really asked banks to stop disbursing ₹500 notes from ATMs by September 2025?
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 12, 2025
A message falsely claiming exactly this is spreading on #WhatsApp #PIBFactCheck
No such instruction has been issued by the @RBI.
₹500 notes will continue to be legal tender.
… pic.twitter.com/znWuedOUT8
हा मेसेज अनेक ठिकाणी पाठवण्यात आल्यामुळं नेमकं खरं काय आणि खोटं काय? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. याच स्थितीत PIB Fact Check या अधिकृत माध्यमातून केंद्रानच हा मेसेच खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकनुसार आरबीआयनं असा कोणताही निर्देश दिला नसून, 500 रुपयांच्या नोटांचा वापर अधिकृतपणे सुरूच राहील. त्यामुळं अशा खोटे दावे करणाऱ्या मेसेज, माहिती अथवा वृत्तांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन PIB च्या वतीनं करण्यात आलं आहे.