Bank News : बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी म्हणून देश स्तरावर विविध बँका अनेक नवे उपक्रम राबवताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एका नव्या उपक्रमाची भर पडली असून, त्याअंतर्गत देशातील पाच बड्या बँका एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यासह देशातील एकूण पाच महत्त्वाच्या सरकारी बँका एकत्र येत एक नवी कंपनी सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
5 बँका एकत्र येत तयार करण्यात येणारी ही कंपनी 5 कोटींहून कमी रिटेल आणि MSME कर्जवसुलीचं काम पाहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सोप्या भाषेत सांगावं तर पाच बँका एकत्र येऊन स्थापल्या जाणारी ही नवी कंपनी कर्जवसुलीचं काम करणार आहे. हे सर्व काम एसबी अलायंस प्राइवेट लिमिटेड (PSB Alliance Pvt Ltd) च्या माध्यमातून पुढे जाईल.
एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार सुरुवातीच्या काळात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाच मोठ्या बँकांचा समावेश असेल. यानंतर या प्रक्रियेमध्ये काही इतर बँकांचाही समावेश असेल. कमी दराची कर्जवसुली अधिक सोप्या आणि प्रभावी पद्धतीनं करणं हा या कंपनीच्या निर्मितीमागचा मुख्य हेतू असेल, ज्यासाठी सर्वप्रथम ब्लू प्रिंट तयार केली जाईल. ज्यानंतर ही संपूर्ण कल्पना पुढे नेण्यात येईल.
नव्यानं कंपनी तयार केली जाण्यामुळं बँकांकडून प्राथमिक व्यवहारांवर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाईल. एकाच ग्राहक/ खातेधारकाकडून विविध बँकांमधून कर्ज घेतलं असल्यास त्याची वसुलीची प्रक्रिया अधिक सोपी होईल. अधकृत माहितीनुसार ही कंपनी 'नेशनल एसेट रिकन्सट्रक्शन कंपनी लिमिटेड'प्रमाणं काम करेल. ज्यामुळं देशात कर्जवसुलीसाठी एक प्रगत प्रणाली पहिल्यांदाच वापरात आणली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
खातेधारकांना या नव्यानं तयार होणाऱ्या कंपनी आणि नव्या धोरणांमुळे सर्व सरकारी बँकांच्या जुन्या कर्जविषयक प्रकरणांवर लक्ष घालता येईल. सध्याच्या घडीला देशातील अर्थ मंत्रालयानं 20 महत्त्वाच्या सरकारी बँकांना निर्देश देत त्यांना टॉप-20 मोठी डबघाईला गेलेली कर्ज आणि तत्सम व्यवहारांची नियमीत समीक्षा करण्याच्या सूचाना केल्या आहेत. पीएसबी अलायन्सशी संलग्न अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये या कंपनीसाठीचं काम सुरू होणार आहे.