SBI revised ATM transaction rules : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अतिशय महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करम्यात आले असून, खातेधारकांनी याची दक्षता बाळगत नवे नियम लक्षात घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार एसबीआयनं नुकतीच एटीएम ट्रान्झॅक्शन चार्ज आणि फ्री युज लिमिटमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 1 मे 2025 पासून एसबीआय ग्राहकांना मोफत मासिक मर्यादा ओलांडल्यानंतर त्यापुढील व्यवहारांसाठी 23 रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे.
SBI नं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मोफत एटीएम व्यवहारांच्या संख्येत बदल केला असून आता दर महिन्यात एसबीआयच्याच एटीएममध्ये विनामूल्य 10 व्यवहार आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये 5 विनामूल्य व्यवहारांची मुभा देण्यात आली आहे.
एसबीआयच्या या नव्या नियमानुसार ज्या खातेधारकांच्या खात्यात सरासरी 25 ते 50 हजार आणि 50 हजार ते 100000 रुपये आहेत त्यांना इतर बँकांच्या एटीएममधून 5 वेळा पैसे काढता येणार आहेत. खात्यावर मासिक शिल्लक सरासरी 100000 रुपयांहून अधिक असल्यास खातेधारकांना एसबीआयसह इतर बँकांच्या एटीएममधून कोणत्याही मर्यादेशीवार रक्कम काढता येणार आहे.
एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिट संपल्यानंतर बँकेकडून पुढील प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये + जीएसटी अशी रक्कम आकारली जाईल. एसबीआयच्या एटीएमसाठी हे नियम लागू राहणार असून, इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढायचे झाल्यास त्यावर एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिटनंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये + जीएसटी अशी रक्कम आकारली जाईल. ट्रान्झॅक्शन अर्थात पैसे काढण्याच्या मर्यादेवर रक्कम आकारली जाणार असून, एसबीआयकडून बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट अशा सेवांवर मात्र ट्रान्झॅक्शन लिमिटनंतरही कोणतंही सेवाशुल्क आकारलं जात नाही.
वरील अट फक्त एसबीआयच्याच एटीएमपुरता सीमित असून, इतर बँकांच्या एटीएममधील व्यवहारांमध्ये मात्र इतर सेवांसाठीसुद्धा 10 रुपये आणि जीएसटी अशी रक्कम आकारली जाईल. तर, खात्यावर पैसे नसल्यास ट्रान्झॅक्शन Fail दाखवल्यास तुम्ही 20 रुपये आणि जीएसटी अशी एकूण रक्कम भरण्यास बांधिल असाल.