Marathi News> भारत
Advertisement

11 दिवसांनी समोर आलं इंजिनीअर निखिलच्या मृत्यूचं कारण; ऐकून ऑफिस कर्मचाऱ्यांना बसेल धक्का!

Krutrim Techie Nikhil Somwanshi: कंपनीचे अमेरिकास्थित व्यवस्थापक राजकिरण पानुगंती यांच्यावर एका व्यक्तीने आरोप केलाय.

11 दिवसांनी समोर आलं इंजिनीअर निखिलच्या मृत्यूचं कारण; ऐकून ऑफिस कर्मचाऱ्यांना बसेल धक्का!

Krutrim Techie Nikhil Somwanshi: कर्नाटकातील बेंगळुरू येथील आगरा तलावात 2 आठवड्यांपूर्वी एका एआय फर्ममधील 25 वर्षीय मशीन लर्निंग इंजिनिअरचा मृतदेह आढळला होता. खराब वर्क कल्चर आणि मॅनेजमेंटकडून होणारे टॉर्चर यामुळे इंजिनीअरने आत्महत्या केल्याचा आरोप फर्मच्या एका कर्मचाऱ्याने केलाय. 8 मे रोजी इंजिनीअर निखिल सोमवंशीचा मृतदेह तलावात आढळला आणि या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. 

निखिल सोमवंशीने बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. यानंतर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तो राइड-हेलिंग अॅप ओलाच्या एआय कंपनी क्रुट्रिममध्ये मशीन लर्निंग इंजिनिअर म्हणून रुजू झाला. सोमवंशी खूप हुशार विद्यार्थी होता. त्यामुळे त्याचे प्लेसमेंट देखील 9.30 GPA सह झाले. असे असतानाही कंपनीत अधिक जबाबदाऱ्यांचा भार त्याच्यावर होता, असा आरोप कंपनीवर करण्यात आलाय. 

ऑफिसमध्ये टॉक्सिक कल्चर 

कंपनीचे अमेरिकास्थित व्यवस्थापक राजकिरण पानुगंती यांच्यावर एका व्यक्तीने आरोप केलाय. पानुगंती दररोज नवीन कर्मचाऱ्यांसोबत आक्षेपार्ह भाषा वापरतात. त्यांनी ऑफिसमध्ये टॉक्सिक कल्चर निर्माण केलंय, ज्यामुळे अनेक टीम मेंबर्सनी राजीनामा दिलाय. क्रुट्रिम कंपनीच्या प्रवक्त्यानेही यावर आपले स्पष्टीकरण दिलंय. कंपनीच्या या नुकसानीमुळे आम्हालाही दुःख झाले आहे. आम्ही एक कष्टाळू कर्मचारी गमावला आहे. मृत्यू झाला त्यादिवशी निखिल सोमवंशी रजेवर असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले.

मॅनेजरवर गंभीर आरोप

कंपनीने ईमेलद्वारे सांगितले की,  'निखिलने 8 एप्रिल रोजी त्याच्या मॅनेजरशी संपर्क साधला आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर निखलला ताबडतोब रजा मंजूर करण्यात आली. नंतर 17 एप्रिल रोजी तो ऑफिसमध्ये आला. पण त्याची तब्येत अजूनही ठीक नव्हती. त्यामुळे त्याची रजाही वाढविण्यात आली.' पण निखिलच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतरही मॅनेजर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत राहिल्याचा आरोप एका कर्मचाऱ्याने केलाय.

कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बरीच महत्वाची माहिती दिली. कंपनीच्या मॅनेजरची प्रतिमा बऱ्याच काळापासून अशीच आहे. तो अनेकदा ज्युनिअर कर्मचाऱ्यांना तुच्छ लेखायचा आणि त्यांना निरुपयोगी ठरवायचा. समोर आलेल्या अहवालानुसार क्रुट्रिमच्या एका माजी कर्मचाऱ्याने मॅनेजरवरील आरोपांना दुजोरा दिला. 'कामाच्या दबावामुळे मीदेखील दुसरी नोकरी मिळण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. माझ्या मनातही आत्महत्या करण्याचा विचार आला होता, असेही त्याने सांगितले. 'तो कर्मचाऱ्यांवर ओरडतो. त्याच्याकडे व्यवस्थापन कौशल्य अजिबात नाही. तो बैठकांमध्येही कर्मचाऱ्यांशी वाईट वागायचा', असे मॅनेजर राजकिरण पानुगंटी यांच्यासोबत काम केलेल्या आणखी एका कर्मचाऱ्या सांगितले.

Read More