Padmanabhaswamy Temple: केरळातील (Kerala News) ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिर अनेकांसाठीच आकर्षणाचा विषय असून, सध्या हे मंदिर एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. सोन्याच्या एका सळईसंदर्भात या मंदिरात घडलेल्या रहस्यामयी घटनाक्रमामुळं सध्या देशभरात एकाच चर्चेला उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी सोन्याची ही सळई मंदिर परिसरातच वाळूमध्ये रुतल्याचं लक्षात आलं.
ही बाब लक्षात येताच पोलिसांनी आणि शोध पथकानं एकत्र येत संयुक्त प्रयत्नांमध्ये ही सळई शोधून काढली. या शोधमोहिमेसाठी स्निफर डॉग्सची मदत घेण्यात आली होती. या घटनेची सर्वाधिक चर्चा होण्याचं कारण म्हणजे सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटनाक्रम पाहिला असता कोणीही व्यक्ती मंदिर परिसराच्या आत किंवा बाहेर येतना दिसत नसून, कोणतीही हालचालही तिथं गिसत नाही. पण तरीही ही सोनसळई किंवा सोन्याचा हा दंड सापडणं म्हणजे एक रहस्यमयी घटनाच असल्याची चर्चा भाविकांमध्ये जोर धरत आहे.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार 27 एप्रिल रोजी मंदिराच्या गर्भगृहाच्या कवाडाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं. जिथं, दरवाजातून काढण्यात आलेल्या सोन्यापासून सोनारानं 12 सेंटीमीटर लांबीची एक सळई तयार केली, ज्याचा वापर दरवाजावर सोन्याच्या प्लेटची जोडणी करण्यासाठी केली जाणार होती. मात्र बुधवारपर्यंत काम पूर्ण झालं आणि मंदिर प्रशासनानं सर्व वस्तू एका कापडी पिशवीमध्ये ठेवून स्ट्राँग रुममध्ये नेल्या शनिवारी सकाळच्या सुमारास जेव्हा ही पिशवी उघडण्यात आली तेव्हा मात्र ती सळई तिथं नव्हतीच.
हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि त्यांनी CCTV फुटेजही तपासून पाहिली. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार गुरुवार आणि शुक्रवारी कोणतंही काम झालं नाही, इतकंच नव्हे तर स्ट्राँग रुमसुद्धा उघडण्यात आला नव्हता. परिणामी संरक्षण यंत्रणांनी मंदिरातीलच व्यक्तींवर संशय व्यक्त केला. मात्र ही सळई सापडल्यामुळं आता रहस्यामध्ये आणखीनच भर पडत आहे. सीसीटीव्हीमध्ये कोणतीही हालचाल न दिसत असल्यानं आणि इतर सर्व गोष्टी जैसे थे असल्यानं ही सळई नेमकी कुठं गेली आणि ती पुन्हा कशी सापडली हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ज्या व्यक्तींकडे सोनं ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची मागणी करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र काहींच्या मते कारवाईच्याच भीतीनं चोरलेली ही सळई निनावी गुन्हेगारानं पुन्हा आणून ठेवली असावी. पद्मनाभस्वामी मंदिरात घडलेल्या या घटनेवर आता तपासातून पुढे नेमक्या कोणत्या गोष्टी उजेडात येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
(वरील माहिती घटनास्थळावरील तपासाच्या आधारे समोर आलेल्या संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)