Marathi News> भारत
Advertisement

महाराष्ट्राला डिवचणाऱ्या निशिकांत दुबेंची AI कडून पोलखोल; संपत्ती 640 टक्क्यांनी वाढली, आकडा एकदा पाहाच!

Nishikant Dubey Networth:  निशिकांत दुबेंची संपत्ती कितीने वाढली ही आकडेवारी समोर आली आहे. 

महाराष्ट्राला डिवचणाऱ्या निशिकांत दुबेंची AI कडून पोलखोल; संपत्ती 640 टक्क्यांनी वाढली, आकडा एकदा पाहाच!

Nishikant Dubey Networth: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. मुंबईत हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांनी हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवावे. आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, असे ते म्हणाले. एवढच्यावरच न थांबता त्यांनी तुम्ही कोणाची भाकर खाता? टाटा, बिर्ला, रिलायन्सची युनिट्स महाराष्ट्रात नाहीत. महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो, असेही त्यांनी म्हटले. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या एका नेत्याच्या संपत्तीची माहिती एक्स पोस्टवर दिली. त्याखालीच एका यूजरने ग्रोकला निशिकांत दुबेंच्या संपत्तीविषयी माहिती विचारली. यातून निशिकांत दुबेंची संपत्ती कितीने वाढली ही आकडेवारी समोर आली आहे. 

निशिकांत दुबे हे मूळचे बिहारमधील भागलपूर असून तिथल्या मारवाडी कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जयपूर येथील प्रताप विद्यापीठातून एमबीए आणि पीएचडी केली. निशिकांत दुबे यांच्या पत्नीचे नाव अनामिका गौतम आहे. निशिकांत दुबे यांनी 15 एप्रिल 2000 रोजी अनामिका गौतमशी लग्न केले. त्यांचा प्रेमविवाह असून निशिकांत दुबे आणि अनामिका गौतम यांना 2 मुले आहेत. दोघेही परदेशात शिक्षण घेत आहेत.

 'माझ्या करियरमध्ये मी खूप पैसे कमावले होते'

निशिकांत दुबे आणि त्यांची पत्नी दोघेही व्यवसाय करतात. अनामिका गौतम सध्या धन्यभूती एंटरप्रायझेस नावाची कंपनी चालवतात. राजकारणात येण्यापूर्वी निशिकांत दुबे यांनी कॉर्पोरेट जगात खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी एस्सार ग्रुपमध्ये बराच काळ कॉर्पोरेट प्रमुख म्हणून काम केले होते. निशिकांत दुबे यांना त्यांच्या मालमत्तेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. राजकारणात येण्यापूर्वी माझ्या करियरमध्ये मी खूप पैसे कमावले होते आणि राजकारणात आल्यानंतरही मी स्वतःचा व्यवसाय चालवत असल्याचे उत्तर निशिकांत दुबेंनी दिले होते. 

राजकीय कारकीर्द

निशिकांत दुबे हे सध्या झारखंडच्या गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. निशिकांत दुबे यांनी पक्षाच्या अनेक संघटनात्मक कामांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निशिकांत दुबे हे 2009पासून झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2009 (15 वी लोकसभा), 2014, 2019 आणि 2024 मध्ये ते गोड्डा येथून सतत जिंकत आहेत. सध्या, निशिकांत दुबे हे भारत सरकारच्या कॉमर्स कमिटीचे सदस्य आणि संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष देखील आहेत.

74 कोटी रुपयांची संपत्ती

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, भाजप खासदार निशिकांत यांची एकूण मालमत्ता सुमारे 74 कोटी रुपयांची आहे. त्यांची देणी 8 कोटींपेक्षा जास्त आहेत. निशिकांत दुबे यांची जंगम मालमत्ता सुमारे 28 ते 30 कोटी रुपयांची आहे. तर त्यांची स्थावर मालमत्ता 43.87 कोटी रुपये इतकी आहे.

पत्नी अनामिका गौतम निशिकांत दुबेंपेक्षा श्रीमंत 

त्यांची पत्नी अनामिका गौतम निशिकांत दुबेंपेक्षा श्रीमंत आहेत. सुमारे 74 कोटी रुपयांच्या एकूण मालमत्तेपैकी अनामिका गौतम यांच्याकडे 51.13 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. उर्वरित सुमारे 23 कोटी रुपयांची मालमत्ता निशिकांत दुबे यांची आहे. निशिकांत दुबे यांचे भागलपूर, पटना, मुंबई, गुडगाव आणि दिल्ली येथे फ्लॅट आणि फार्म हाऊस आहेत. 2019 च्या प्रतिज्ञापत्रात निशिकांत दुबे यांनी लक्झरी कारची माहिती दिली होती. पण 2024 मध्ये वाहनाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Read More