Blade Inside New Soap Bar: मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथील एका कुटुंबाने डेटॉल साबण निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या प्रोडक्शनसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. या कुटुंबाने विकत घेतलेल्या 10 रुपयांच्या डेटॉल साबणामध्ये ब्लेड सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अंघोळीदरम्यान या कुटुंबातील एका चिमुकल्याने हा साबण गालावर घासल्याने त्याच्या गालाला साबणामधील ब्लेडमुळे इजा झाल्याचा दावाही कुटुंबाने केला आहे.
हा सारा प्रकार समोर आल्याननंतर जखमी मुलाच्या वडिलांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक 1915 वर कॉल करुन अधिकृतरित्या कंपनीसंदर्भात तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या मुलाचं नाव अंश असं आहे. आपल्या मित्रांसोबत खेळून घरी आल्यानंतर हातपाय आणि तोंड धुण्यासाठी बाथरुममध्ये गेलेल्या अंशने साबण चेहऱ्यावर घासण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला गालातून रक्त येत असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्याने नीट पाहिलं असता साबणात काहीतरी असल्याचं त्याला दिसलं. तोपर्यंत त्याचा गाल रक्ताने माखला होता.
एकाबाजूने चेहरा रक्तबंबाळ झाल्याने घाबरलेल्या अंशने बाथरुममधूनच आरडाओरड सुरु केला. मुलाचा आवाज ऐकून धावत बाथरुममध्ये आलेले अंशचे वडील अंगद सिंह तोमर यांना साबणात ब्लेड दिसल्यानंतर नेमकं काय घडलं याचा अंदाज आला. त्यांनी मुलाला धीर देत बाथरुमबाहेर काढत त्याच्या गालावर झालेल्या जखमेवर प्रथमोपचार केले. त्यांनी ग्राहक हेल्पलाइन क्रमांकावरुन घडलेल्या प्रकाराची माहिती देत अधिकृत तक्रार दाखल केली.
कंपनीच्या साबण निर्मिती युनिटमधील ही चूक आहे की पॅकेजिंगदरम्यान हे ब्लेड साबणात अडकलं अथवा स्थानिक दुकानामध्ये साबणाशी काही छेडछाड केल्याने हा प्रकार घडला याबद्दलची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही, असं 'फ्री प्रेस'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. बाहोदपूरमधील आनंद नगर येथे राहणाऱ्या सिंह कुटुंबाने 21 मे रोजी स्थानिक किरणामालाच्या दुकानातून खरेदी केलेल्या डेटॉल साबणामध्ये अशाप्रकारे ब्लेड आढळून आल्याने अंगद सिंह यांनी स्वत: या दुकानात जाऊन तक्रार केली. त्यावेळी दुकानदारालाही सारा प्रकार ऐकून धक्का बसला. त्याने या ब्लेड असणाऱ्या साबणाच्या जागी दुसरा साबण दिला. मात्र घरी गेल्यानंतर अंगद यांनी हा साबण पाण्यात टाकून चाचपणी केली असता त्यामध्येही ब्लेड आढळून आलं. अंगद यांनी 1915 या राष्ट्रीय ग्राहक तक्रार हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला. "या प्रकारामुळे माझ्या मुलाचा जीवही जाऊ शकला असता," असं अंगद यांनी तक्रारीत म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून तक्रार करताना त्यांनी साबणाच्या फोटोसहीत इतर माहितीही दिली आहे. या प्रकरणात संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर आपण कोर्टात हे प्रकरण घेऊन जाऊ असं अंगद यांनी म्हटलं आहे.
डेटॉल कंपनीने यासंदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "डेटॉल साबणात रेझर ब्लेड आढळल्याच्या कथित प्रकरणांबद्दल आम्हाला मीडिया रिपोर्ट्समधून माहिती मिळाली आहे. या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी कंपनी या प्रकरणाची सक्रियपणे चौकशी करत आहे. आजपर्यंत, आम्हाला कोणत्याही ग्राहकाकडून कोणतीही औपचारिक तक्रार किंवा अशाप्रकारच्या घटनेची सूचना मिळालेली नाही किंवा कोणत्याही व्यक्तीने आमच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाही. आमच्या सर्व साबणाच्या कव्हरवर आमचे ग्राहक सेवा संपर्क तपशील छापलेले असतानाही आमच्याकडे कोणीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. त्यामुळेच आम्ही सध्या आरोपाच्या सत्यतेवर भाष्य करू शकत नाही. सध्या तरी प्रथमदर्शनी हे बनावट उत्पादनांचे प्रकरण किंवा ब्रँडची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने चालवलेल्या दुर्देवी मोहीमेचा भाग असल्याचं दिसत आहे."
"आम्ही तक्रारदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. तथापि, आमच्याकडे त्यांचे संपर्क तपशील नाहीत. याव्यतिरिक्त, आम्ही ज्या घाऊक विक्रेत्याकडून साबण खरेदी केला होता त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि चाचणीसाठी नमुने गोळा केले आहेत. आम्ही माध्यमांना विनंती करतो की त्यांच्याकडे असलेली कोणतीही संबंधित माहिती देऊन आम्हाला मदत करावी, विशेषतः त्यांनी दावा करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेतली असल्याने आम्हाला यामध्ये सहकार्य करावं," असंही कंपनीने कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.
"आम्ही हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की डेटॉल हा दशकांपासून भारतीय घरांमधील एक विश्वासार्ह ब्रॅण्ड राहिला आहे. हा ब्रॅण्ड गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्वच्छतेसाठी अढळ वचनबद्धतेवर ठाम आहे. प्रत्येक डेटॉल साबणाची वडी अशा ठिकाणी तयार केली जाते जिथे जागतिक गुणवत्ता मानकांचे कठोर पद्धतीने पालन केलं जातं. संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत अनेक गुणवत्ता तपासणी केल्या जातात. आम्ही अशा दाव्यांप्रती कठोरतेनं आणि वस्तुनिष्ठतेने मूल्यांकन करण्यासंदर्भातील प्रोटोकॉल पाळतो. आम्ही आमच्या ग्राहकांची सुरक्षितता आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि अधिक माहिती उपलब्ध होताच त्याबद्दल सर्वांना अपडेट करू," असं कंपनीने निवेदनाच्या शेवटी म्हटलं आहे.