Marathi News> भारत
Advertisement

Sikkim Landslide: लष्करी छावणीवर कोसळली दरड, तिघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता! 1500+ पर्यटक अडकले

Landslide On Army Camp: मागील काही दिवसांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत.

Sikkim Landslide: लष्करी छावणीवर कोसळली दरड, तिघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता! 1500+ पर्यटक अडकले

Landslide On Army Camp: ईशान्य भारतामधील राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी जमीन खचल्याच्या आणि दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सिक्किममध्ये रविवारी, 1 जून 2025 रोजी सायंकाळी लष्करी छावणीवर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवानांचाही समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या दुर्घटनेनंतर नऊ जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांचा शोध घेतला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममध्ये ही दुर्घटना 1 जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. डोंगर कड्याचा एक मोठा भाग तुटून लष्करी छावणीवर पडला. यामुळे छावणीबरोबरच आजूबाजूच्या घरांचंही नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना झालेल्या परिसरामधील अनेकजण बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि दरडीखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

उत्तर सिक्कीममध्ये जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी दरड कोसळली असल्याने बरेच रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. येथील लोचन आणि लाचुंग परिसरामध्ये दीड हजार पर्यटक अडकून पडले आहेत. मंगन जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सोनम देचू भूटिया यांनी लाचेनमध्ये 115 आणि लाचुंगमध्ये 1350 पर्यटक अडकले आहेत. दोन्ही बाजूने रस्ते बंद असल्याने पर्यटक अडकून पडलेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचुंग येथील वाहतूक आज सकाळपासून काही प्रमाणात सुरु झाली असून आज अनेक पर्यटकांना बाहेर काढलं जाणार आहे. बीआरओच्या टीमने रस्त्यावर पडलेला डोंगरकड्याचा मलबा बाजूला केला आहे. फिडांगमध्ये 'सस्पेन्शन ब्रिज' जवळ पडलेल्या भेगा भरण्यात आल्या आहेत. यामुळे अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यास अधिक वेग मिळेल. लाचुंग-चुंगथंग-शिपज्ञेरे-शंकलांग-डिकचू रोड मार्गाने पर्यटकांना बाहेर काढलं जाणार आहे. 

30 मे रोजी अचानक ढगफुटी झाल्याने उत्तर सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या ठिकाणी 130 मिमीहून अधिक पाऊस पडला असून लाचेन, लाचुंग, गुरुदोंग्मर, द व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स आणि झिरो पॉइण्टसहीत अनेक पर्यटन स्थळांना मोठं नुकसान झालं आहे. 

Read More