Share Market Crash: शेअर बाजाराच्या उलथापालथीमध्ये अनेकांचच मोठं नुकसान झालं. गुंतवणुकदारांना हादरा बसला, अनेकांचीच गुंतवणूक शून्यात गेली. कामकाजाच्या दिवसाची सुरुवात झाली त्या क्षणापासून सोमवारी शेअर बाजारात अतिशय गंभीर चित्र पाहायला मिळालं. सेन्सेक्स 700 अंकांनी पडला तर, निफ्टी 0.67 टक्क्यांनी खाली घसरून ही आकडेवारी 24,585.95 वर पोहोचली. इथं पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं शेअर बाजार कोसळलेला असतानाच तिथं, अनिल अंबानींवर मात्र पैशांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर ( Reliance Power) च्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. ग्लोबल मार्केटच्या आकडेवारीनुसार सोमवारी शेअर बाजाराचा कारभार घसरणीनंच सुरू झाला. अमेरिका आणि चीनमध्ये असणाऱ्या व्यापारी संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानं संपूर्ण शेअर बाजारामध्येच तोट्याचे दिवस सुरू असल्याचं चित्र आहे. तर तिथं, अमेरिकेत जॉब डेटा येण्यापूर्वी गुंतवणुकदारांनी सतर्कता बाळगण्यास सुरूवात केली असून, फक्त भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय शेअर बाजारामध्येसुद्धा पैशांचं हे गणित बिघडल्याचं पाहायला मिळालं.
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केलेल्या अनेकांचच मोठं नुकसान होत असतानाच अनिल अंबानी मात्र नफ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांच्या रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये अपर सर्किट पाहायला मिळत असून, सोमवारी या शेअरमध्ये 5.95 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. ज्यामुळं हा शेअर 61.58 अंकांनी वधारला.
मागच्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच शुक्रवारी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आणि शेअर 60 रुपयांवर पोहोचले होते. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या 52 आठवड्यातील सर्वाधिक उच्चांकी उसळी पाहायला मिळाली असून, एकट्या मे महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 30 टक्क्यांची उसळी आली आहे, तर या वर्षभरात या शेअरनं गुंतवणूकदारांना 140 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
2020 मध्ये डोकावून पाहिल्यास रिलायन्स पॉवरचा एक शेअर 2 रुपयांच्या स्तरावर होता आणि आजच्या घडीला त्याचीच किंमत 61.39 रुपये असून त्याचा थेट फायदा अनिल अंबानींनाही होताना दिसत आहे. रिलायन्स पॉवरची एकंदर कामगिरी आणि मागील तीन महिन्यांची कंपनीची कामगिरी पाहता या शेअरमध्ये आलेली तेजी पाहून व्यवसाय क्षेत्रात सध्या अंबानींच्या या धाकट्या भावाचीच चर्चा सुरू आहे हेच खरं.