अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor) पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरच्या (Sanjay Kapoor) मृत्यूनंतर आता कुटुंबात नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, संजय कपूरची आई राणी कपूर (Rani Kapoor) यांनी कुटुंबाच्या मालकीच्या सोना कॉमस्टार कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या काही तास आधी गंभीर आरोप केले आहेत. बंद दरवाजाआड आपल्याला काही कागदपत्रावंर जबरदस्तीने सही करायला लावली असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच उदरनिर्वाहासाठी काही निवडक लोकांच्या दयेवर सोडले असल्याचं सांगितलं आहे.
सोना कॉमस्टार बोर्डाला लिहिलेल्या भावनिक पत्रात राणी कपूर यांनी आपली ओळख सोना ग्रुपच्या बहुसंख्य भागधारक म्हणून करुन दिली आहे, ज्यामध्ये सोना कॉमस्टारचा समावेश आहे. जून महिन्यात इंग्लंडमध्ये निधन झालेल्या मुलाच्या निधनाबद्दल अद्याप पूर्णपणे शोकही व्यक्त केलेला नसताना "स्पष्टीकरण न देता विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं गेलं". असाही आरोप केला आहे.
राणी कपूर यांनी बोर्डावर 'काही लोकांच्या' (त्यांचा इशारा प्रिया सचदेवकडे असल्याचं काहींचं म्हणणं आहे) नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे. कुटुंबाच्या वतीने बोलण्याचा त्यांचा दावा "मी जबरदस्तीने केलेल्या कागदपत्रांवर" आधारित असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राणी कपूर यांनी कपंनीची वार्षिक सर्वसाधारण सभा दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलली जावी अशी मागणीही केली आहे.
राणी कपूर यांनी पत्रात दावा केला आहे की, "प्रचंड मानसिक आणि भावनिक तणावात असतानाही मला बंद दरवाजाआड काही कागदपत्रांवर सही करण्यास भाग पाडण्यात आलं. मी वारंवार त्यात काय लिहिलं आहे याची माहिती देण्याची मागणी करुनही, ती सांगण्यात आली नाही".
"मला माझी आर्थिक खाती हाताळण्यासही नकार दिला जात आहे याचीही नोंद घ्यावी. मला जगण्यासाठी काही निवडक लोकांच्या दयेवर सोडण्यात आले आहे. हे सर्व, माझ्या एकुलत्या एका मुलाच्या निधनाच्या एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत घडलं आहे," अशी हतबलता त्यांनी पत्रातून मांडली आहे.
मुलाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत असताना आपल्या 'शत्रूंनी' कुटुंबाचा वारसा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, त्या म्हणाल्या आहेत की, त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंडावरील एका गोष्टीची माहिती देण्यात आली होती, ती म्हणजे "काही संचालकांना कपूर कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा ठराव मंजूर करणे". हा निर्णय घेताना आपल्याशी कोणताही सल्लामसलत झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
"रेकॉर्डसाठी, मला सांगायचं आहे की माझ्या मुलाच्या निधनानंतर कंपनीच्या किंवा सोना ग्रुपच्या इतर कोणत्याही कंपनीच्या संचालक मंडळावर येण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला संमती दिलेली नाही किंवा अधिकृतपणे नामांकित केलेले नाही, किंवा सोना ग्रुपच्या कोणत्याही कंपनीसमोर माझे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला संमती दिलेली नाही", असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील कथेप्रमाणे उलगडणाऱ्या या पत्रात राणी कपूर यांनी दावा केला आहे की, काही "हितचिंतकांनी" सुरु असलेल्या "बेकायदेशीर गोष्टी" अधोरेखित केल्या असून त्यामुळे त्या "विचलित" झाल्या होत्या.
अखेरीस त्यांनी म्हटलं आहे की, "या टप्प्यावर मी विविध गंभीर बेकायदेशीर गोष्टींबद्दल अधिक विस्तारपण बोलू इच्छित नाही. माझ्या संमतीशिवाय कोणतेही निर्णय घेतले जाऊ नयेत इतकंच सांगणं आहे".