Marathi News> भारत
Advertisement

ऐन दिवाळीत निघणार चीनचं दिवाळं; चीनी वस्तूंविरोधात सरकारची रणनिती

भारतीय व्यापाऱ्यांकडून 'हिंदुस्तानी दीपावली'चं आवाहन करण्यात आलं आहे.

ऐन दिवाळीत निघणार चीनचं दिवाळं; चीनी वस्तूंविरोधात सरकारची रणनिती

नवी दिल्ली : भारतात यंदा अखिल भारतीय व्यापारी परिसंघाने (CAIT) 'हिंदुस्तानी दीपावली'चं आवाहन केलं आहे. त्यामुळे यंदा देशभरात व्यापारी केवळ मेड इन इंडिया सामान आणि फटाक्यांची विक्री करणार आहेत. भारतातील व्यापाऱ्यांच्या या मोहिमेमुळे चीनला जवळपास 40 हजार कोटींचा फटका बसणार आहे. 

'कॅट'च्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष पूनम गुप्ता यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'आत्मनिर्भर भारत अभियान' आणि 'वोकल फॉर लोकल'ला पुढे घेऊन जाण्यासाठी संघाने या मोहिमेअंतर्गत ही पावलं उचचली आहेत. यामुळे केवळ चीनला आर्थिक फटकाच बसणार नसून, भारतातील हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

दरवर्षी जस-जशी दिवाळी जवळ येते, तसं चीनमधून मोठ्या प्रमाणात लाईट्स, दिवे, फटाके, देवांच्या मूर्ती आणि अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा व्यापाऱ्यांनी चीनमध्ये बनलेल्या सामानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी चीनमधून सामान आयात होण्याऐवजी, त्याच सामानाची मोठी ऑर्डर भारतीय कंपन्यांना देण्यात आली आहे.

गलवान खोऱ्यात चीनकडून झालेल्या हिंसक झडपेनंतर, देशभरातील व्यापाऱ्यांनी चीनी सामानावर बहिष्कार टाकण्याची तयारी केली आहे. याला यशस्वी करण्यासाठी 'कॅट'ने शुक्रवारी एक व्हर्च्युअल मिटिंग आयोजित केली होती. या मिटिंगसाठी देशभरातील मोठे व्यापारी सामिल झाले होते. मिटिंगमध्ये चीनी सामानावर बहिष्कारासह, भारतात बनलेल्या 300 वस्तूंचीही चर्चा करण्यात आली. या वस्तूंची देशातील वेग-वेगळ्या राज्यात विक्री करण्यात येणार आहे.

 

Read More