Viral Video: कॅनेडियन ट्रॅव्हल व्लॉगर नोलन सामुरे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याने भारतातील जंगलातून स्कूटरवर प्रवास करत असताना एक अत्यंत धक्कादायक अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. या अनुभवात नोलनचा थेट सामना एका जंगली हत्तीशी झाला. यावेळी त्याचा मित्र देखील सोबत होता आणि त्याचा जीव अक्षरशः तो क्षणात वाचला.
हा संपूर्ण प्रसंग नोलनने स्वतःच्या कॅमेऱ्यात टिपला. व्हिडीओमध्ये तो निवांतपणे स्कूटरवरून प्रवास करत असतो. काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक भला मोठा हत्ती उभा असतो. नोलन त्याच्याशी शांतपणे संवाद साधतो आणि गाडीचा वेग कमी करतो. विनोदाच्या सुरात तो हत्तीला विचारतो, 'साहेब, तुम्ही रस्त्यावर का आराम करत आहात?'
सुरुवातीला सगळं स्थिर वाटतं, पण नोलनचा मित्र स्कूटरवर घटनास्थळी पोहोचतो आणि हत्तीला अस्वस्थ वाटायला लागतं. हत्ती पुढे सरकतो आणि त्याच क्षणी नोलनचा मित्र स्कूटर वळवून पुढे येतो. वेळेवर घेतलेली ही कृती त्याच्या जीवासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.
हा व्हिडीओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. नोलनने या घटनेवर भाष्य करत सांगितले की, 'भारतातील वन्यजीवनाचा सन्मान केला पाहिजे. आपल्याला या प्राण्यांच्या ठिकाणी वावरताना जबाबदारीने वागायला हवे.' जंगलातील प्रवास करताना काय काळजी घ्यावी याबाबतही अनेक नेटकऱ्यांनी मत मांडले. एका नेटकऱ्याने लिहिले, 'हा त्यांचा प्रदेश आहे, इथे आपण पाहुणे आहोत. त्यामुळे अति उत्साही न होता, सावधगिरी बाळगा. तर दुसऱ्याने विनोदी पद्धतीने लिहिले, 'हत्तीला वाटलं ब्रिटिश परत आले. म्हणून त्याने स्वतः हातात कारवाई घेतली.'
या प्रसंगातून हे स्पष्ट होते की, वन्यजीवाच्या ठिकाणी गेल्यावर कोणतीही कृती संयमाने आणि शहाणपणाने करणे गरजेचे असते. थोडीशी असावधता जीवावर बेतू शकते. हा अनुभव पर्यटकांसाठी आणि व्लॉगरसाठी एक चेतावणीचे उदाहरण ठरू शकतं. निसर्गाशी जुळवून घेताना सन्मान आणि संयम सर्वात महत्त्वाचे आहेत.