Case Against Nishikant Dubey Wife: महाराष्ट्रामध्ये महिन्याभरापासून अधिक काळ मराठी आणि हिंदीसंदर्भातील वाद चांगलाच तापलेला आहे. या वादामध्ये राज्याबाहेरील काही नेत्यांनी उडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामध्ये झारखंडमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी 5 जुलै रोजी घेतलेल्या जल्लोष मेळाव्यानंतर हिंदीविरोधी भूमिकेवर टीका करताना निशिकांत दुबेंचा तोल सुटला. निशिकांत दुबेंनी "महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो, महाराष्ट्राकडे आहे काय? इकडे या मराठी माणसांना आपटून आपटून मारु," अशी वादग्रस्त विधान केली. यावरुन दोन दिवसांपूर्वीच संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील तीन महिला खासदारांनी संसदेच्या लॉबीमध्ये दुबेंना जाब विचारला. एकीकडे या घडामोडी घडत असतानाच आता दुबेंची पत्नीही नको त्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
मराठी माणसाविरोधात गरळ ओकणारे भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिक गौतम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनामिका गौतम यांनी मेडिकल कॉलेजसाठी बँकेतून 100 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. मात्र त्यांनी हे कर्ज फेडलेलं नाही. हेच 100 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्तीचं नाव देवता पांडेय असं आहे. देवता हा निशिकांत दुबेंचा समर्थक म्हणून ओळखला जातो.
झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनी बुधवारी या संदर्भात आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. अनामिका गौतम यांच्या विरुद्ध हा 47 वा गुन्हा आहे, असे मरांडी यांनी 'एक्स' पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्रही लिहिले आहे. काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून ही कारवाई केली असावी. राजकीय लढाई थेट असायला हवी. कुटुंब आणि समर्थकांना टार्गेट करणे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. राजकीय सूड म्हणून सत्तेचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा मरांडी यांनी व्यक्त केली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, भाजप खासदार निशिकांत यांची एकूण मालमत्ता सुमारे 74 कोटी रुपयांची आहे. त्यांची देणी 8 कोटींपेक्षा जास्त आहेत. निशिकांत दुबे यांची जंगम मालमत्ता सुमारे 28 ते 30 कोटी रुपयांची आहे. तर त्यांची स्थावर मालमत्ता 43.87 कोटी रुपये इतकी आहे.
त्यांची पत्नी अनामिका गौतम निशिकांत दुबेंपेक्षा श्रीमंत आहेत. सुमारे 74 कोटी रुपयांच्या एकूण मालमत्तेपैकी अनामिका गौतम यांच्याकडे 51.13 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. उर्वरित सुमारे 23 कोटी रुपयांची मालमत्ता निशिकांत दुबे यांची आहे. निशिकांत दुबे यांचे भागलपूर, पटना, मुंबई, गुडगाव आणि दिल्ली येथे फ्लॅट आणि फार्म हाऊस आहेत. 2019 च्या प्रतिज्ञापत्रात निशिकांत दुबे यांनी लक्झरी कारची माहिती दिली होती. पण 2024 मध्ये वाहनाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
निशिकांत दुबे हे मूळचे बिहारमधील भागलपूर असून तिथल्या मारवाडी कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जयपूर येथील प्रताप विद्यापीठातून एमबीए आणि पीएचडी केली. निशिकांत दुबे यांच्या पत्नीचे नाव अनामिका गौतम आहे. निशिकांत दुबे यांनी 15 एप्रिल 2000 रोजी अनामिका गौतमशी लग्न केले. त्यांचा प्रेमविवाह असून निशिकांत दुबे आणि अनामिका गौतम यांना 2 मुले आहेत. दोघेही परदेशात शिक्षण घेत आहेत.