Sunjay Kapoor Death: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरच्या निधनानंतर 30 हजार कोटींच्या सोना ग्रुपच्या नियंत्रणावरुन सासू आणि सून आमने-सामने आहेत. संजय कपूरची आई राणी कपूर (Rani Kapoor) यांनी कुटुंबाच्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या काही तास आधी गंभीर आरोप केले होते. बंद दरवाजाआड आपल्याला काही कागदपत्रावंर जबरदस्तीने सही करायला लावली असा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे सून प्रिया सचदेववर केला होता. त्यातच आता त्यांच्या नव्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. आपल्या मुलाची हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राणी कपूर यांनी लिहिलेलं पत्र त्यांच्या हाती लागलं आहे. राणी कपूर यांनी या पत्रात दावा केला आहे की, "त्यांच्याकडे विश्वसनीय आणि चिंताजनक पुरावे आहेत ज्यामधून त्यांचा (संजय कपूर) मृत्यू अपघाती किंवा नैसर्गिक नसावा असं सूचित होत आहे. त्यात खून, प्रोत्साहन, कट, फसवणूक आणि बनावटगिरीचा समावेश असू शकतो".
त्यांच्याकडे बनावट, संशयास्पद मालमत्ता हस्तांतरण आणि संशयास्पद कायदेशीर दाखले, (आणि) त्यांच्या मृत्यूपासून आर्थिक फायदा मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींमधील संगनमताचे संकेत देणारे रेकॉर्ड आहेत असाही दावा त्यांनी केला आहे. त्यांचा इशारा संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेवकडे आहे.
"युनायटेड किंग्डम, भारत आणि कदाचित अमेरिकेतील व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग असलेल्या एका समन्वित आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणून त्याच्या मृत्यूचं नियोजन करण्यात आले असावे, असं मानण्याची ठोस कारणं आहेत," असंही राणी कपूर यांनी त्यांच्या पत्रात ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
"या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता आणि यूके कायद्यांतर्गतील अनेक गुन्हे ज्यात खून, गुन्हा करण्याचा कट, खोटे प्रतिनिधित्व करून फसवणूक, बनावटगिरी यांचा समावेश पाहता मी औपचारिक तक्रार त्वरित नोंदवण्याची आणि गुन्हेगारी चौकशी सुरू करण्याची विनंती करते," असंही त्यांनी म्हटलं आहे.
53 वर्षीय कपूर यांचे 12 जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु त्यांच्या तोंडात मधमाशी गेल्याने त्यांना अॅनाफिलेक्टिक शॉक लागल्याचे वृत्त आहे.
मुलाच्या मृत्यूनंतर गेल्या महिन्यात राणी कपूर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या बोलल्या. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "माझ्या मुलाला काय झाले हे मला अजूनही माहित नाही... मी आता म्हातारी झाले आहे. जाण्यापूर्वी मला हे प्रकरण पूर्णत्वास जावं असं वाटतं".
FAQ
1. संजय कपूर कोण होते?
संजय कपूर हे बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती आणि 30 हजार कोटींच्या सोना ग्रुपशी संबंधित उद्योगपती होते.
2. संजय कपूर यांच्या मृत्यूबाबत काय विवाद आहे?
संजय कपूर यांच्या आई, राणी कपूर यांनी त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, संजय यांचा मृत्यू अपघाती किंवा नैसर्गिक नसून त्यामागे खून, कट, फसवणूक आणि बनावटगिरीचा समावेश असू शकतो.
3. या प्रकरणाचा बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याशी काय संबंध आहे?
करिश्मा कपूर या संजय कपूर यांच्या माजी पत्नी आहेत. मात्र, या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग असल्याचा कोणताही उल्लेख नाही. वाद प्रामुख्याने राणी कपूर आणि प्रिया सचदेव यांच्यात आहे.