China making dam on Brahmaputra river: चीन ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधत आहे. हे धरण म्हणजे पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक वॉटरबॉम्ब ठरणार आहे. इतकचं नाही तर चीनच्या या महाकाय धरणामुळे भारत डेंजर झोनमध्ये येमार असल्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. चीनने या धरणाचे बांधकाम सुरु केले आहे. भारत आणि बांगलादेशने चिंता व्यक्त केली आहे. तज्ञांच्या मते, याचा पाण्याच्या प्रवाहावर आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो.
चीनने भारतीय सीमेजवळ आग्नेय तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर एका मोठ्या धरणाचे बांधकाम सुरू केले आहे. डिसेंबर 2024 मध्ये या धरण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. आता चीननेही त्याची पायाभरणी केली आहे. या धरण प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात चीनचे पंतप्रधान ली कियांग सहभागी झाले होते. हा कार्यक्रम अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या तिबेटच्या न्यिंगची प्रदेशात झाला.
चीन ब्रह्मपुत्र नदीवर 'वॉटर बॉम्ब' बांधत आहे असा इशारा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. हा प्रकल्प भारताच्या सुरक्षेला आणि अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण करू शकतो अशी भिती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पावर चीन सुमारे 167 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. यात पाच जलविद्युत केंद्रांचा समावेश आहे. यांग्त्झी नदीवर बांधलेल्या थ्री गॉर्जेस धरणाइतकी वीज या प्रकल्पातून निर्माण होईल असा दावा चीनने केला आहे.
चीनने या प्रकल्पाला तिबेट प्रदेशाच्या विकासाशी आणि कार्बन न्यूट्रल होण्याच्या ध्येयाशी जोडले आहे. सरकारी माध्यमांनुसार, यामुळे तिबेटच्या स्थानिक वीज गरजा देखील पूर्ण होतील. या वर्षी जानेवारीमध्ये भारताने या प्रकल्पाबद्दल चिंता व्यक्त केली होती. परराष्ट्र मंत्रालयाने चीनला ब्रह्मपुत्रेच्या खालच्या भागात कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन केले होते. प्रत्युत्तरादाखल चीनने दावा केला होता की हा प्रकल्प सुरक्षित आहे. या प्रकल्पाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा देखील चीनने केला होता.
या धरणाच्या बांधकामाचा परिणाम भारतातील ईशान्येकडील राज्यांवर होऊ शकतो. भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्याना या धरणाच्या बांधकामाचा फटका बसू शकतो. जर चीनने नदीचे पाणी थांबवले किंवा तिचा प्रवाह बदलला तर भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर किंवा दुष्काळासारख्या समस्या उद्भवू शकतात.
ब्रम्हपुत्र ही नदी तिबेटमधून सुरू होते. ही नदी भारतात आणि नंतर बांगलादेशात जाते. अशा परिस्थितीत, या प्रकल्पाचा बांगलादेशवरही परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी, मुख्यमंत्री खांडू म्हणाले की चीनने अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय जल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. अशा परिस्थितीत, त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी इशारा दिला की चीन काय करू शकतो हे कोणालाही माहिती नाही.