Marathi News> भारत
Advertisement

‘देवा आता तुलाच....’, राम मंदिराच्या सुनावणीदरम्यान मूर्तीसमोर बसायचे CJI चंद्रचूड; स्वत: केला खुलासा

CJI Chandrachud on Ayodhya Ram Temple: अयोध्या राम मंदिराच्या निकालात कायदेशीर प्रक्रियेसह अध्यात्मिक आस्थेने महत्त्वाची भूमिका निभावली असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी ते अनेकदा देवाच्या मूर्तीसमोर बसायचे असंही सांगितलं आहे.   

‘देवा आता तुलाच....’, राम मंदिराच्या सुनावणीदरम्यान मूर्तीसमोर बसायचे CJI चंद्रचूड; स्वत: केला खुलासा

CJI Chandrachud on Ayodhya Ram Temple: अयोध्या राम मंदिरासंबंधी (Ayodhya Ram Temple) ऐतिहासिक निकाल देणारे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी मोठं विधान केलं आहे. आपल्यासाठी अयोध्या-बाबरी मशीद वादावर तोडगा काढणं फार कठीण होतं असं ते म्हणाले आहेत. तोडगा काढण्यासाठी आम्हाला देवाकडे प्रार्थना करावी लागली असंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यातील खेड तालुक्याच्या कन्हेरसर गावातील सभेला संबोधित करताना सरन्यायाधीशांनी भाष्य केलं. 

सरन्यायाधीशांनी सांगितलं की, “आमच्याकडे अनेकदा अशी प्रकरणं येतात ज्याच्यावर तोडगा निघत नाही. असंच काहीसं अयोध्या राम मंदिराच्या (राम जन्मभूमी-बाबरी मशीद) वेळी झालं होतं. हे प्रकरण तीन महिने माझ्यासमोर होतं. मी देवासमोर बसून सांगितलं की, देवा आता तुलाच यावर तोडगा काढावा लागेल”. जर तुमची श्रद्धा असेल आणि नियमितपणे देवाकडे प्रार्थना केली तर देव तुम्हाला रस्ता दाखवतो असं सरन्यायाधीश म्हणाले. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेसह अध्यात्मिक आस्थाही महत्वपूर्ण भूमिका निभावते असंही ते म्हणाले आहेत. 

अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय 

9 नोव्हेंबर 2019 रोजी चंद्रचूड हे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय खंडपीठाचा भाग होते ज्याने अयोध्या-बाबरी मशीद वादावर ऐतिहासिक निकाल दिला होता. या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत त्याच ठिकाणी मंदिर बांधण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी मुस्लिम पक्षाला काही अंतरावर 5 एकर जागा देण्याचे आदेश दिले होते, तिथे मशीद बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

10 नोव्हेंबरला संपतोय कार्यकाळ

शतकाहून अधिक जुन्या वादावर तोडगा निघाल्यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये अयोध्येत राम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षी जुलैमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही राम मंदिरात प्रार्थना केली होती. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

Read More