Rahul Gandhi on Narendra Modi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी म्हणजे फक्त दिखावा आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. नरेंद्र मोदींमध्ये काहीच दम नाही असंही ते म्हणाले आहेत. दिल्लीमधील तालकटोरा स्टेडिअममध्ये बोलताना राहुल गांधींनी म्हटलं आहे की, "नरेंद्र मोदी फक्त दिखावा आहेत. त्यांना जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. पण प्रत्यक्षात असं काहीही नाही". राहुल गांधी यांनी असाही दावा केला की पंतप्रधान मोदींना दोन-तीन वेळा भेटल्यानंतर आणि त्यांच्यासोबत एकाच खोलीत बसल्यानंतर त्यांना जाणवले की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी कधीही 'मोठी समस्या' राहिले नाहीत.
आपल्या विधानाचा पुनरुच्चार करताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, "हा माझा वैयक्तिक अनुभव आहे की त्यांच्यात काही दम नाही". भारतातील नोकरशाहीमध्ये वंचित आणि उपेक्षित समुदायांचे प्रतिनिधित्व कमी असण्यावरुनही काँग्रेस खासदाराने केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, "देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 90 टक्के दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर हलवा वाटला जात होता, तेव्हा या 90 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे कोणीही नव्हते. ही 90 टक्के लोकसंख्या ही देशाची उत्पादक शक्ती आहे.'
राहुल गांधींनी पुढे म्हटलं की, "तुम्ही हलवा बनवता, पण तेच खाऊन टाकतात. त्यांना हलवा खाऊ नये असं आमचं म्हणणं नाही. पण किमान तो तुम्हाला तर मिळायला हवा". तेलंगणाच्या काँग्रेस सरकारकडून मिळवलेल्या आकडेवारीचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, "तेलंगणात एससी, एसटी आणि ओबीसी समुदायातील लोकांना लाखो आणि कोटी रुपयांचे पगार पॅकेज मिळत नाही कारण ते कॉर्पोरेट संस्था आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा भाग नाहीत".
प्रश्न- राहुल गांधींच्या हलव्याच्या उदाहरणाचा अर्थ काय आहे?
उत्तर- विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेकदा म्हटलं आहे की, एससी-एसटी आणि ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येनुसार देशाच्या संसाधनांवर अधिकार असले पाहिजेत. यासाठी ते वेगवेगळी उदाहरणे देत राहतात.
प्रश्न- 25 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या ओबीसी न्याय संमेलनात राहुल गांधी काय म्हणाले?
उत्तर- राहुल गांधी म्हणाले की 2014 पूर्वी, केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळात, त्यांनी जातीय जनगणना न करून मोठी चूक केली होती, जी ते दुरुस्त करू इच्छितात.