Rahul Gandhi News : लोकसभेतील (Loksabha) विरोधी पक्षनेते राहुल गांधी कायमच त्यांच्या नवनवीन संकल्पनांमुळे फक्त राजकीय वर्तुळातच नव्हे, तर बहुविध कारणांनी सामान्यांमध्येसुद्धा चर्चेत असतात. अनेकदा तर त्यांच्या काही कृती विरोधी पक्षातील नेत्यांचीही मनं जिंकून जातात. याच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एका स्तुत्य कृतीनं अनेकांकडूनच कौतुकाची थाप मिळवली आहे.
(Jammu Kashmir) जम्मू काश्मीरमधील (Pahalgaum Terrorist Attack) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत (India Pakistan Tension) या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून सीमाभागात प्रचंड गोळीबार आणि क्षेपणास्त्रांचा मारासुद्धा करण्यात आला. ज्याचा सर्वाधिक परिणाम या क्षेत्रांतील गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांवर झाल्याचं दिसून आलं. पाकिस्तानकडून याचदरम्यान झालेल्या हल्ल्यांमध्ये ज्या बालकांनी त्यांचे आई-वडील गमावले अशा 22 मुलांना दत्तक घेत त्यांचा आधार होण्याचा निर्णय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला आहे.
जम्मू काश्मीरचे काँग्रेस प्रमुख तारिक हामिद कर्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी पुंछमधील अशा 22 मुलांना दत्तक घेणार आहेत ज्यांनी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबार आणि तत्सम हल्ल्यात आपले जन्मदाते गमावले. या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च राहुल गांधी उचलणार असून, त्यासाठीचं पहिलं पाऊल अर्थात आर्थिक मदतीचा पहिला ओघ बुधवारी जारीसुद्धा करण्यात आल्याची माहिती कर्रा यांनी दिली. या मुलांच्या पदवी शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी गांधी यांचीच असेल.
यंदाच्याच वर्षी मे महिन्यामध्ये राहुल गांधी पुंछ दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान तणावादरम्यान प्रभावित झालेल्या मुलांची यादी तयार करण्याचं काम स्थानिक नेत्यांवर सोपवलं होतं. ज्यानंतर या नेत्यांनी सरकारी कागदपत्र आणि तपशीलाचा आधार घेत ही यादी तयार केली आणि राहुल गांधी यांची मदत त्या गरजवंत मुलांपर्यंत पोहोचू शकली.
पुंछ दौऱ्यादरम्यान ज्या शाळेला राहुल गांधी यांनी भेट दिली होती, तेथील मुलांना त्यांनी धीर देण्याचा प्रयत्नही केल्याचं पाहायला मिळालं. 'तुम्हाला निश्तितच भीती वाटत असेल. मात्र सर्वकाही सुरळीत आणि पूर्ववत होईल. या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तुमच्याकडे एकच मार्ग असेल, तो म्हणजे जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा', असं म्हणत त्यांनी या मुलांना शिक्षणाचं महत्त्वं पटवून सांगितलं होतं. याच सूचक विधानानंतर आता राहुल गांधी यांची ही अनुकरणीय कृती अनेकांचच मन जिंकत आहे.