उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका शिपायाच्या पत्नीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बीकेटीच्या बाना गावातील या घटनेने सगळेच हादरले आहेत. उत्तर पोलिसात कॉन्स्टेबल असणारी अनुरागची पत्नी 35 वर्षीय सौम्या उर्फ तनुने इंस्टाग्रामला लाईव्ह करत गळफास घेतला आणि आत्महत्या केली.
या व्हिडीओत सौम्याने आपला पती अनुराग, नणंद, दीर आणि इतरांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर नातेवाईकांना याची माहिती दिली. तसंच सौम्याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. पोलीस निरीक्षक संजय कुमार सिंह यांनी कुटुंबाकडून तक्रार मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्या मूळची मैनपुरीच्या पुतैना रोड येथे वास्तव्यास होती. अनुराग बीकेटी टाण्यात ईगल मोबाईलवर तैनात आहे आणि बाना गावात भाड्याचं घर घेऊन पत्नीसह वास्तव्य करत होता. शेजाऱ्यांनी सांगितलं आहे की, "अनुराग रविवारी सकाळी सौम्याला मारहाण करायचा. तिच्या ओरडण्याचा आवाज आम्हाला येत असे".
त्यानंतर काही वेळातच सौम्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सौम्याचा मोबाईल ताब्यात घेतला. यावेळी त्यांना जवळपास 12 वाजण्याच्या सुमारास सौम्या इंस्टाग्रामला लाईव्ह आल्याचं आणि दोन व्हिडीओ शेअर केल्याचं समजलं. पहिल्या व्हिडीओत तिने शरिरावरील जखमा दाखवल्या होत्या. तर दुसऱ्या व्हिडीओत गळफास घेऊन उभी होती.
व्हिडिओमध्ये सौम्याने सांगितलं की, अनुरागसोबत तिचा मेहुणा संजय, जो रायबरेलीत पोलिसात आहे, मेहुणा रणजीत, जो वकील आहे, सर्वांना तिच्या पतीने पुन्हा लग्न करावे असं वाटत होतं. त्यांच्या सांगण्यानुसार, अनुराग तिला मारून दुसऱ्याशी लग्न करावे म्हणून हुंड्याची मागणी करत मारहाण आणि छळ करायचा.
"त्यांना त्याचं दुसरं लग्न करायचं आहे. हिला मारुन टाक, आम्ही तुला वाचवू असं त्याचा वकिल भाऊ सांगत आहे. हुंड्यात काही आणलं नाही म्हणून मारहाण करतात. यांना सोडलं जाऊ नये. पण मुलीच सुरक्षित नाहीत. यांच्याकडे पैसा असल्याने काहीही करु शकतात. मी पोलीस ठाण्यात जाऊन दमले," असं ती व्हिडीओत सांगत आहे.
सौम्याने सांगितले की तिने पोलिस ठाण्यात अनेक वेळा तक्रार केली, पण कोणतीही सुनावणी झाली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी व्हिडिओ बनवून हे पाऊल उचलले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना न्याय द्यावा आणि सर्व आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यादरम्यान तिने मोदीजी मुली शिकवा, मुली वाचवा म्हणतात पण मुलीच सुरक्षित नाहीत अशी खंतही बोलून दाखवली.
पोलीस ठाण्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या, पण कोणीही ऐकून घेतलं नाही असा तिचा आरोप आहे. सौम्याने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, "अनुराग तिला दररोज छळतो. त्याने याबद्दल पोलिस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण कोणीही ऐकले नाही".
घरमालक ललता सिंग यांनी सांगितलं होतं की, "मारहाण होत असताना अनुरागने कोणाचेही ऐकले नाही. या कारणास्तव, त्याला अनेक वेळा खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले, परंतु पोलिसांचा दबाव टाकत तसं केलं नाही".