Marathi News> भारत
Advertisement

'बलात्कार टाळायचा असेल तर...', पोलिसांनीच लावलेल्या पोस्टर्सने खळबळ; 'मित्रांसोबत अंधारात...'

Gujarat Controversial Posters In Ahmedabad: रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर झळकवण्यात आलेले हे पोस्टर्स पाहून संतापाची लाट पसली आहे.

'बलात्कार टाळायचा असेल तर...', पोलिसांनीच लावलेल्या पोस्टर्सने खळबळ; 'मित्रांसोबत अंधारात...'

Gujarat Controversial Posters In Ahmedabad: बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचवायचे असेल तर घरीच थांबा, या आशयाचे पोस्टर्स गुजरातमध्ये झळकले आहेत. अहमदाबाद शहरात लागलेले हे पोस्टपासून स्थानिकांना मोठा धक्का बसला असून या पोस्टर्सवरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात पोस्टर्स लावले आहेत. मात्र, यापैकी काही पोस्टर्सवरील मजकूर वादात सापडला आहे. या पोस्टर्सच्या माध्यमातून बलात्कार टाळायचा असेल तर घरी थांबवण्याचा सल्ला महिलांना दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

वादग्रस्त पोस्टर्समध्ये काय?

वाहतूक पोलिसांनी शहरातील काही भागांमध्ये जनजागृतीसंदर्भातील पोस्टर्स लावली आहेत. रात्री उशिरा पार्टीला जाऊ नका. तुमच्यासोबत बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो. आपल्या मित्रांसोबत अंधारात किंवा निर्जनस्थळी जाऊ नका. तिथे तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाला तर? असा मजकूर लिहिलेली पोस्टर्स शहरातील चांदलोडिया क्षेत्रातील रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आलेली. 

पोलिसांनी या प्रकरणाबद्दल काय म्हटलं?

या पोस्टर्सवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरल्यानंतर वाहतूक विभागाविरोधात टीकेची झोड उठली त्यानंतर ही पोस्टर्स काढण्यात आली आहेत. मात्र हे प्रकरण शेकणार अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने आता वाहतूक विभागाने या पोस्टर्सची जबाबदारी नाकारली आहे. वाहतूक पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एकही पोस्टर्स लावले नाही. पोलिसांनी लावलेली पोस्टर्स केवळ वाहतूक सुरक्षेसंदर्भात असल्याचा दावा पोलिस उपायुक्त (पश्चिम वाहतूक) नीता देसाई यांनी केला आहे. 'सतर्कता ग्रुप' नामक एका स्वयंसेवी संस्थेने वाहतूक पोलिसांच्या संमतीशिवाय ही वादग्रस्त पोस्टर्स लावली असल्याचा दावा देसाई यांनी केला आहे.

राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

सदर पोस्टर्स प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. "राज्यात रोज पाचपेक्षा जास्त बलात्कार होत आहेत. या पोस्टर्समधून राज्यात महिला सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होते. गुजरातमधील महिलांनी रात्री घराबाहेर पडू नये का?" असा सवाल 'आप'ने विचारले आहे.

सोशल मीडियावरुनही या पोस्टर्ससंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संदेश देण्याचा, सुरक्षेचा संदेश देण्याची ही कोणती असंवेदनशील पद्धत आहे? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणावरुन पोलीस खात्याने जबाबदारी झटकली असतानाच हे पोस्टर्स लावले तरी कोणी असा सवाल उपस्थित केला जातोय. 

Read More