Marathi News> भारत
Advertisement

Corona : गरम पाणी, च्यावनप्राश आणि बरंच काही... अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

आयुष मंत्रालयाकडून देण्यात आला मोलाचा सल्ला.... 

Corona : गरम पाणी, च्यावनप्राश आणि बरंच काही... अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

नवी दिल्ली : आयुष मंत्रालयाकडून CoronaVirus कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता नुकतीच काही महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाशी लढा देण्यासाठी आणि सावधगिरी म्हणून आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून काही उपाय आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे श्वसनासंबंधीच्या उपायांचाही समावेश आहे. आयुर्वेदीक साहित्य आणि अभ्यासकांच्या माहितीवर हे उपाय आधारले आहेत. 

कोविड 19मुळे सध्या संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. त्यामुळे शरीरांतर्गत रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत करणं गरजेचं असल्याची बाब आयुष मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आली. कोरोना विषाणूवर अद्यापही उपायकारक लस सापडलेली नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीच्या बळावर या विषाणूला रोखता येणं शक्य होऊ शकतं. ज्यासाठी काही सोपे आणि तितकेच फायदेशीर उपाय अवलंबात आणणं बऱ्याच अंशी फायद्याचं ठरु शकतं. 

हे उपाय खालीलप्रमाणे... 

दिवसभर गरम पाणी पिणं

दर दिवशी किमान अर्ध्या तासासाठी योगसाधना करणं

प्राणायाम आणि ध्यानसाधना करणं

स्वयंपाकामध्ये हळद, धणे, जीरं इत्यादी मसाल्यांचा वापर करणं. 

याव्यतिरिक्त रोज सकाळी एक चमचा च्यावनप्राश (मधुमेहींनी बिना साखरेचं) खाणं फायदेशीर ठरेल.

आयुष मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार दिवसातून एक-दोनदा हर्बल चहा, किंवा तुळस-काळीमिरी-सुंठ आणि मनुका यांचा काढा पिणं फायद्याचं ठरु शकेल. अथवा १५०  मिलीलीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून हे मिश्रण पिणंही या साऱ्यामधीलच एक उपाय आहे. 

दिवसभरात सकाळी आणि सायंकाळी दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ किंवा नारळाचं तेल अथवा तूप लावण्याचा आयुर्वेदिक उपाय लाभदायी ठरु शकतो, असंही आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

 

कोरडा खोकला असल्यास दिवसातून एकदा पुदीन्याची ताजी पानं किंवा औव्याची वाफ घेणं उपयुक्त ठरेल. शिवाय घशात खवखव असल्यास साखर किंवा मधातून लवंग पूडीचं मिश्रण खाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या उपायांनी कोरडा खोकला दूर होतो. पण, तरीही ही लक्षणं दिसल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

 

Read More