Government Employees Important News: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा महागाई भत्ता अवघा 2 टक्क्यांपर्यंत मिळणार असल्याचे वृत्त आहे. मागील वर्षी हाच आकडा तीन ते चार टक्क्यादरम्यान होता. खरोखरच जर कर्मचाऱ्यांना 2 टक्के महागाई भत्ता मिळाला तर मागील सात वर्षांमध्ये म्हणजेच जून 2018 नंतर मिळालेला हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरेल. ऑल इंडिया कंझ्युमर प्राइज इंडेक्सच्या महागाई भत्त्याच्या आकडेमोडीमधून हे समोर आलं आहे. 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता आणि डीआरच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देते. यापैकी एक हफ्ता जानेवारी तर दुसरा जुलैमध्ये दिला जातो. जुलै 2024 रोजी डीएमध्ये 50 टक्क्यांवरुन 53 टक्क्यांपर्यंत म्हणजेच 3 टक्के वाढ करण्यात आली. मार्च 2024 मध्ये डीए 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्क्यांवरुन 50 टक्के करण्यात आलं. ऑक्टोबर 2024 मध्ये सातव्या वेतन आयोगानुसार डीए आणि डीआरमध्ये 3 टक्के वाढ करुन ते 53 टक्के करण्यात आलं.
सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. मात्र त्यापूर्वी 2025 च्या दिवाळीच्या आसपास सातव्या वेतनआयोगाअंतर्गत महागाई भत्त्याचा एक हफ्ता मिळणार आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता हा मूळ पगाराचा भाग होणार आहे.
महागाईच्या वाढत्या दरापासून दिलासा मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. मागील काही वर्षांमध्ये मिळालेल्या भत्त्याच्या तुलनेत यंदा मिळणारा 2 टक्क्यांचा महागाई भत्ता हा फारच सामान्य आहे, असं कर्मचाऱ्यांना वाटू शकतं. भविष्यातील पगार कसे असतील यासाठी आठवा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. 1 जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मार्च 2026 मध्ये अंतिम अहवाल जाहीर केला जाईल.