Marathi News> भारत
Advertisement

घरातील पार्टी, उघडा दरवाजा अन् 25 कोटींची चोरी; दिल्लीत चक्रावून टाकणारा दरोडा

Delhi Jewellery Shop Robbery: या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये रविवारी कोट्यवधी रुपयांची चोरी झाली. मात्र या चोरीचा खुलासा थेट मंगळवारी झाल्यानंतर स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

घरातील पार्टी, उघडा दरवाजा अन् 25 कोटींची चोरी; दिल्लीत चक्रावून टाकणारा दरोडा

Delhi Jewellery Shop Robbery: दिल्लीमधील ज्वेलर्सच्या दुकानावर पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या दरोड्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ज्वेलर्सच्या दुकानाला लागूनच असलेल्या घरामध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीच्या आडूनच चोरांनी या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी नवीन दिल्लीतील भोगल परिसरामधील उमराव सिंह ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा पडला. नवी दिल्लीमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या ज्वेलर्स दरोड्यामध्ये या दरोड्याचा समावेश केला जात असून तब्बल 25 कोटींचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे.

नेमकं घडलं काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या घरामधून ज्वेलर्सच्या दुकानाच्या गच्चीवर प्रवेश मिळवला. सामान्यपणे ज्वेलर्सच्या दुकानाजवळ असलेलं गेट बंद केलं जातं. मात्र त्या दिवशी या दुकानाच्या बाजूला राहणाऱ्या भाडोत्रींनी घरी पार्टी असल्याने त्यांच्या विनंतीनुसार ज्वेलर्सच्या मालकांनी हे गेट बंद केलं नाही. भाडोत्रींनी पहिल्या मजल्यावर पार्टी करण्यासाठी हे गेट उघडं ठेवावं अशी विनंती केली होती. हे गेट उघडं असल्याने चोर थेट या भाडोत्रींच्या घराच्या दारापर्यंत पोहोचले आणि तिथून त्यांनी ज्वेलर्सच्या गच्चीवर प्रवेश मिळवला. या घराच्या मागील बाजूस कोणताही रस्ता नसल्याने तिकडून चोरांनी प्रवेश करण्याची काहीही शक्यता नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

आधी सीसीटीव्ही डिस्कनेक्ट केले अन् मग...

ज्वेलर्सच्या दुकानावर डल्ला मारण्यासाठी आलेले हे चोर चालाख होते. त्यांनी दुकानामध्ये प्रवेश करण्यासाठी सीसीटीव्ही बंद केले. त्यामुळे त्यांची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली नाही. या चोरांनी ज्वेलर्सच्या गच्चीला मोठं भगदाड पाडलं. तिथून ते चोर ज्वेलर्सच्या दुकानातील लॉकरपर्यंत पोहचले. त्यांनी या लॉकरमधील सर्व दागिणे चोरले. चोरांनी केवळ लॉकरमधील दागिणे चोरले नाहीत तर ग्राहकांना दाखवण्यासाठी डिस्प्लेला ठेवलेले दागिनेही त्यांनी लंपास केले. 

मंगळवारी समजलं दुकानात झाली चोरी

दुकानामध्ये चोरी रविवारी झाली. मात्र याची माहिती ज्वेलर्सच्या दुकानाच्या मालकाला मंगळवारी मिळाली. दुकान रविवारी रात्री बंद करण्यात आलं होतं. सोमवारी दुकान बंद होतं. त्यामुळे जेव्हा मंगळवारी सकाळी दुकान उघडलं तेव्हा दुकानात चोरी झाल्याची माहिती समोर आली. ही चोरी 4 ते 5 लोकांनी मिळून केल्याचं सांगितलं जात आहे. संशयित आरोपींमध्ये या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. चोरीच्या घटनेच्या 15 दिवस आधीपासून त्याने अचानक कामावर येणं बंद केलं होतं. 

Read More