Marathi News> भारत
Advertisement

सरसंघचालक मोहन भागवतांनी अचानक मुस्लिम धर्मीय नेत्यांची बैठक का बोलावली? खरं कारण आलं समोर

Delhi RSS Chief Mohan Bhagwat News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदावर असलेल्या मोहन भागवत यांनी अचानक मुस्लिम धर्मीय नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यामागे नेमकं काय कारण आहे? याची सर्वत्र चर्चा सुरु असल्याचं दिसतंय.

सरसंघचालक मोहन भागवतांनी अचानक मुस्लिम धर्मीय नेत्यांची बैठक का बोलावली? खरं कारण आलं समोर

Delhi RSS Chief Mohan Bhagwat News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी बोलावलेल्या एका बैठकीची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होताना दिसतेय. मोहन भागवत आज दिल्लीतील हरियाणा भवन येथे मुस्लिम धर्मीय नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीला अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांच्यासह अनेक मुस्लिम धार्मिक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत संघाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय होसाबळे, कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमारदेखील उपस्थित राहणार आहेत. मोहन भागवत यांनी अचानक मुस्लिम नेत्यांची बैठक का बोलावली याबद्दल बऱ्याच चर्चा सुरु आहेत.

या भेटीचं कारण काय?

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ही बैठक मुस्लिम समुदायाशी संवाद वाढवण्यासाठी संघाच्या नियमित प्रयत्नांचाच एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. आरएसएसशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंच म्हणजेच एमआरएम ही संघटना मागील बऱ्याच काळापासून मुस्लिम विद्वान, धार्मिक नेते आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधत आहे. 2023 मध्ये, मंचाने 'एक राष्ट्र-एक ध्वज-एक राष्ट्रगीत' या भावनेने अल्पसंख्याक समुदायाशी संवादाची देशव्यापी मोहीम चालवण्याची घोषणा केली होती. 

याआधीही भागवातांनी घेतल्यात अशा बैठकी

यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये देखील मोहन भागवत यांनी अनेक मुस्लिम समाजातील विचारवंत आणि नावाजलेल्या व्यक्तींची भेट घेतली होती. त्यावेळी धार्मिक समावेशकता, ज्ञानवापी मशीद, हिजाब वाद आणि लोकसंख्या नियंत्रण यासारख्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली होती. बैठकीत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी, माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, एएमयूचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल जमीउद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि उद्योजक सईद शेरवानी असे अनेक नावाजलेल्या व्यक्ती उपस्थित होत्या.

प्रत्येकाला धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य

ऑक्टोबर 2022 संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनीही दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन दर्ग्याला भेट दिली. जिथे त्यांनी दर्ग्याच्या परिसरात दिपप्रज्वलन केलं होतं. कोणीही जबरदस्तीने धर्मांतर करू नये किंवा हिंसाचार करू नये, असं इंद्रेश कुमार यांनी यावेळी दिलेल्या भाषणात म्हटलेलं. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि सर्व धर्मांचा आदर महत्त्वाचा आहे, असंही इंद्रेश कुमार यांनी अधोरेखित केलेलं.

भागवतांनी मशीदीला दिलेली भेट

सप्टेंबर 2022 मध्ये मोहन भागवत यांनी स्वतः अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी दिल्लीतील एका मशीद आणि मदरशालाही मोहन भागवत यांनी भेट दिलेली. या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून संघाकडून धार्मिक सलोखा आणि संवादाचा उपक्रम हाती घेतल्याचं चित्र दिसत आहे. सध्या तरी काही वेळामध्येच होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read More