Marathi News> भारत
Advertisement

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांची तटबंदी; नेमकं प्रकरण काय?

Rahul Gandhi : दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या भाषणाबाबत उत्तर मागितले आहे. रविवारी पुन्हा दिल्ली पोलिसांचे पथक नोटीस घेऊन राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले होते.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांची तटबंदी; नेमकं प्रकरण काय?

Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दुसऱ्यांदा नोटीस दिली आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा रविवारी पुन्हा नोटीस देण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. याआधीही 16 मार्च रोजी पोलीस नोटीस बजावण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते मात्र पथकाला तासनतास वाट पहावी लागली होती. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना नोटीस बजावत दिल्ली पोलिसांनी त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.

रविवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलीस दाखल झाल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल गांधी यांच्या घराबाहेरही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गेटवर बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. दिल्ली पोलीस राहुल गांधी यांच्या घरी पोहोचताच काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक गेहलोत, पवन खेडा आणि शक्ती सिंह गोहिल हेही त्यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी पोहोचले. भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते.

कॉंग्रेस आक्रमक

राहुल गांधी यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांच्या तटबंदीमुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रा संपवून 45 दिवस झाले आहेत. दिल्ली पोलीस 45 दिवसांनी चौकशीसाठी येत आहेत. त्यांना इतकी चिंता होती तर ते फेब्रुवारीत त्यांच्याकडे का गेले नाहीत? राहुल गांधी यांची कायदेशीर टीम यावर उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया   जयराम रमेश यांनी दिली.

राहुल गांधी यांनी मागितला वेळ

"आम्ही राहुल गांधींसोबत चर्चा केली आहे. त्यांनी म्हणाला मला याबाबत थोडा वेळ हवा आहे आणि तुम्ही जी माहिती मागितली आहे ती मी तुम्हाला देईल. आमची नोटीस त्यांच्या कार्यालयाने स्वीकारली आहे आणि जर चौकशी करायची असेल तर आम्ही करू," अशी माहिती विशेष सीपी सागर प्रीत हुडा यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात दिल्ली पोलिसांना त्यांच्याकडून माहिती घ्यायची असल्याने त्यांनी नोटीस बजावली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये याबाबत भाष्य केले होते. महिलांवर अजूनही लैंगिक अत्याचार होत असल्याचं मी ऐकलं आहे. एका प्रकरणात माझे बलात्कार झालेल्या दिल्लीतील एका मुलीशी संभाषण झाले होते. यावेळी मी तिला विचारले की, आपण पोलिसांना कॉल करुया का? त्यावर तिने घाबरत कृपया पोलिसांना कॉल करू नका, असे सांगितले, असे राहुल गांधी म्हणाले होते.

पोलिसांनी काय सांगितले?

"30 जानेवारी रोजी राहुल गांधींनी एक विधान केले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांना रडणाऱ्या अनेक महिला भेटल्या होत्या. आपल्यावर बलात्कार झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा विनयभंग झाला आहे, त्यांचे नातेवाईकही त्यांचा विनयभंग करत होते, असे त्यांनी राहुल गांधींना सागितल्याचे ते म्हणाले होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. 15 मार्च रोजी दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 16 मार्च रोजी राहुल गांधींना नोटीस देण्यात आली होती. आजही आम्ही त्यांच्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून लवकरात लवकर कायदेशीर कारवाई सुरू होऊन पीडितांना न्याय मिळू शकेल," असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

Read More