Why So Many People Have Birthday On 1st June: काय मग, रात्री 12 वाजल्यापासून इन्स्टा स्टोरी, व्हॉट्सअप स्टेटसला अनेकांच्या वाढदिवसाच्या पोस्ट पाहून झाल्याचं असतील तुमच्या, नाही का? आज आहे एक जून म्हणजेच भारतीयांच्या भाषेत सांगायचं झाल्यास सरकारी वाढदिवसाचा दिवस! तुमच्याही ओळखीत आज अनेकांचे वाढदिवस असतीलच यात शंका नाही. अनेक फॅमेली व्हॉट्सअप ग्रुपवर तर शुभेच्छांचा पाऊस रात्रीपासूनच पडत असेल. मात्र एक जूनला भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे वाढदिवस का असतात तुम्हाला माहितीये का? यामागे फारच भन्नाट कारण आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
एका अंदाजानुसार भारतातील प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आज म्हणजेच 1 जून रोजी असतो. ही आकडेवारी खरी मानली तर भारतामधील 146 कोटी जनतेचा विचार केल्यास आज 29 कोटीहून अधिक भारतीयांचा वाढदिवस आहे असं ढोबळपणे म्हणता येईल.
"जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे…!" असं प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपल्या लाडक्या पुलंचं एक वाक्य आहे. आता या वाक्यातून तुम्हाला 1 जूनला ढीगाने वाढदिवस का असतात हे समजलं असेलच. 1 जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा हा 'ऑन पेपर बर्थ डे' आहे. 40 ते 45 वर्षांपूर्वीपर्यंत सध्या बंधनकारक करण्यात आलं आहे त्याप्रमाणे जन्म-मृत्यूची नोंद ठेवण्याचा प्रकार अस्तित्वातच नव्हता. त्यामुळे जन्माचा दाखला वगैरे प्रकाराला फारसं महत्त्व नव्हतं. तसेच पूर्वीच्या काळी बहुतांश महिलांची प्रसुती ही सुईणींच्या मदतीने घरच्या घरीच व्हायची. त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयांमध्ये नोंद असेलच असंही काही नव्हतं. आता अशा जन्मतारखेची नोंद नसणाऱ्या मुलांना शाळेत दाखला घेताना त्यांची जन्मतारीख विचारली जायची. त्यावेळेस फारसं शिक्षण नसल्याने अनेक आई-वडील मास्तरांना काय सोयीचं पडेल असं विचारायचे. त्यानुसार मास्तरही 1 जूनला जन्म झाला अशी नोंद करुन घ्यायचे.
नक्की वाचा >> GK: 'जून' शब्दाचा नेमका अर्थ काय? हे नाव आलं कुठून? लग्नशी याचा संबंध काय? जाणून घ्या रंजक माहिती
आता एक जूनच तारीख का यामागील कारण म्हणजे या तारखेपर्यंत जवळपास अर्ध वर्ष सरलेलं असतं आणि भारतामधील शैक्षणिक वर्षाच्या रचनेचा मुलांना पुढील वर्गात दाखला देता येतो. त्यामुळे शालेय दाखल्यावर हीच तारीख असल्याने तो जन्माचा पुरावा म्हणून पुढे सगळीकडे वापरला जातो. त्याच अनुषंगाने अशा मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख ही'ऑन पेपर' तरी 1 जूनच हीच असते.
एक जून ही तारीख ऑन पेपर जन्मतारीख होण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागातून अधिक वाढण्याचा काळ साधारणपणे सन 1985 पासून पुढचा आहे. याच वर्षापासून जन्माचा दाखला बनवून घेणं आणि तो बनवला नसेल तर शाळेत दाखल करताना तो बनवणं अनिवार्य करण्यात आलं. त्यामुळेच अनेकांच्या जन्मदाखल्यावर सोयिस्कर म्हणून 1 जून ही तारीख असायची. एकदा का दाखल्यावर ही तारीख लागली की तीच तारीख सगळीकडे जन्मतारीख म्हणून वापरली जायची. म्हणूनच या दिवसाला वाढदिवसांचा दिवस असंही म्हणतात.
या तारखेला सरकारी वाढदिवस असंही म्हणतात. सरकारी नियमांप्रमाणे निवृत्तीला आलेली व्यक्ती वयोमर्यादेनुसार वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होते. आता वरील सर्व कारणांचा विचार केल्यास 1 जूनला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे. 1 जूनला वयाची 60 वर्ष पूर्ण करणारे अनेक सरकारी कर्मचारी 31 मे रोजी निवृत्त होतात. तुमच्याही ओळखीत असं नुकतचं कोणीतरी निवृत्त झालेलं असेलच!