Doomsday Fish In Tamil Nadu: तिसरं महायुद्ध, प्रलय, महापूर, महात्सुनामी, भूकंप या आणि अशा अनेक संकटांचं सावट सध्या संपूर्ण जगावर असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे, तर खगोलशास्त्र आणि तत्सम विद्यांचं ज्ञान असणाऱ्या काही जाणकारांनी या वर्षाविषयी सांगितलेली काही भाकितं खरी होत असल्यानं भीतीत आणखी वाढ होताना दिसत आहे. याच संकटांची पूर्वसूचना आता थेट भारतात पोहोचली असून, भारतीय समुद्रकिनारी भागांसह सध्या देशभरात यामुळं चिंतेची लाट पाहायला मिळत आहे.
ही चिंता वाढवण्यास मुख्य कारण म्हणजे मासेमारांच्या जाळ्यात सापडलेला एक विचित्र मासा. हल्लीच तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारांच्या जाळ्यात प्रलयकारी मासा म्हणून ओळखला जाणारा 'ओअरफिश' अर्थात 'डूम्सडे फिश' सापडला आहे. साधारण चंदेरी रंगाचा आणि एखाद्या फितीसारखा दिसणारा हा मासा जास्तीच जास्त 30 फूट लांबीचा असतो आणि त्याच्यावर लाल रंगाचा पिसाराही असतो.
सहसा हा मासा समुद्रात 200 ते 1000 मीटर खोलवरच्या अंतरात सापडतो. मात्र तो सागरीपृष्ठावर येणं ही बाब मात्र अशुभसूचक मानलीह जात असून एकिकडे सामान्यांची चिंता वाढत आहे, तर दुसरीकडे अभ्यासक आणि संशोधकांची जिज्ञासासुद्धा जागृत करत आहे.
एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या बातमीनुसार ओअरफिश किंवा डूम्सडे फिश हा मासा नैसर्गिक आपत्तीचे आणि विध्वंसाचे संकेत देतो. जपान आणि फिलिपिन्समध्ये असणाऱ्या मान्यतांनुसार समुद्राच्या पृष्ठावर हा मासा दिसताच हे भूकंप किंवा त्सुनामीचे संकेत असल्याचे संकेत ग्रृहित धरले जातात. जपानी लोककथांमध्ये या माशाला ‘Ryugu no Sukai’ असंही संबोधलं जातं. सागरी दैवतांचा संदेशवाहक असा त्याचा अर्थ होतो.
राहिला मुद्दा हा मासा भारतात केव्हा सापडला, तर 30 मे 2025 ला हा मासा तामिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडल्याचं म्हटलं जातं. मासा जाळात येताच तो पाहिल्यानंतर कोणतंतरी मोठं संकट येणार अशीच भीती मासेमारांच्या मनात घर करून केली आणि तेव्हापासूनच या राज्यात मान्सूनचा प्रचंड मारासुद्धा सुरू झाला. ज्यामुळं पावसाचं हे रौद्र रुप या भीतीत आणखी भर टाकताना दिसलं.
मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास हा मासा आणि आपत्तीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध दिसून आला. 2011 ला जपानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंप आणि त्सुनामीपूर्वी 20 ओअरफिश आढळले होते. 2017 मध्ये फिलिपिन्समध्ये आलेल्या भूकंपाआधीसुद्धा हा मासा दिसला होता. तर, मेक्सिकोमध्येही हा मासा दिसल्यानंतर एक मोठा भूकंप आला होता.
एकिकडे जनसामान्यांमध्ये या माशाचा थेट संबंध आपत्तीशीच जोडला जात असतानाच शास्त्रज्ञ मात्र ही बाब नाकारतात. 2019 ला ‘Bulletin of the Seismological Society of America’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निरीक्षणात ओअरफिश आणि नैसर्गिक आपत्तीचा कोणताही थेट संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
मासा आजारी असल्यास, सागरी तळाच्या तापमानाच वाढ झाल्यास किंवा इतर हवामान बदलांमुळं हा मासा सागरी पृष्ठावर येतो आणि त्याचा नैसर्गिक आपत्तीशी काहीही संबंध नाही असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे.