Donald Trump Tariff: अमेरिका आणि भारत (India America Tariff War) या दोन्ही राष्ट्रांमध्ये आतापर्यंत सुरळीत असणाऱ्या संबंधांमध्ये आयात शुल्काच्या वादावरून मीठाचा खडा पडला आहे. आर्थिक महासत्ता राष्ट्र अशी जागतिक स्तरावर ओळख असणाऱ्या अमेरिकेनं भारतावर 50 टक्के आयात शुल्क लागू केल्यानंतर आता भारतानंसुद्धा ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात ठाम भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
मोदी सरकारकडून ट्रम्प यांच्या आयात शुल्कासंदर्भातील धोरणाला सामोरं जाण्यासाठी विचारमंथन सुरू झालं असून त्यासाठी विरोधी बाकावर बसणाऱ्या काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्यासह सरकार पुढील आखणी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहानुसार थरुर यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्र धोरणांसंदर्भातील एक स्थायी समिती नव्यानं घडलेल्या घडामोडींचा आढावा घेईल. सूत्रांच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य, उद्योग मंत्रालयाचं प्रतिनिधीत्वं करणाऱ्या समिती भारताच्या परराष्ट्र घटनाक्रमासंदर्भातील माहिती संबंधितांना देणार असून या चर्चेच्या केंद्रस्थानी अमेरिका आणि भारतामध्ये आयात शुल्कावरुन उद्भवलला तणाव आणि तत्सम मुद्दे असतील. आता या संपूर्ण स्थितीमध्ये परराष्ट्र धोरणांचं उत्तम ज्ञान अवगत असणाऱ्या शशी थरुर यांच्याकडून मोदी सरकार नेमकी कशी मदत घेतं हे पाहणंसुद्धा इथं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयानं संसदीय समितीला दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एका निर्णयानं भारतासोबतच्या राजकीय नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून दोन्ही देशांमधील विश्वासाला तडा गेला असला तरीसुद्धा भारत अमेरिकेशी रचनात्मक तत्त्वांवर व्यवहार, व्यापारासाठी तयार असल्याचं सूचित करण्यात आलं.
यापूर्वी अमेरिकेनं भारतावर लगावलेल्या 50 टक्के आयात शुल्काच्या मुद्द्यावर खुद्द थरुर यांनी प्रतिक्रिया देत भारतानं आपल्या हिताचंही रक्षण करणं अपेक्षित असल्याचं म्हटलं. ‘सध्या जे सुरुय ते अतिशय चिंताजनक असून ज्या देशाशी आपले घनिष्ठ संबंध होते आणि राजकीय पटलावर आपण भागिदारीनं काम करत होतो, त्याच देशानं आपलं धोरण बदलल्यानं भारतालाही अनेक मुद्द्यांवर विचार करावा लागेल’, असं सूचक विधान थरुर यांनी केलं. येत्या दोन ते तीन आठवड्यात यावर विचारपूर्वत पद्धतीनं तोडगा काढला जाईल असं म्हणत भारताचं हित केंद्रस्थानीच असलं पाहिजे हा मुद्दाच त्यांनी अधोरेखित केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कोणते आयात शुल्क लादले आहे?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2025 मध्ये भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 50% आयात शुल्क लादले आहे. यामध्ये 2 एप्रिल 2025 रोजी 27% “प्रतिशुल्क” (reciprocal tariff), 30 जुलै 2025 रोजी 25% शुल्क आणि 6 ऑगस्ट 2025 रोजी आणखी 25% शुल्काचा समावेश आहे.
या शुल्काचा उद्देश काय आहे?
ट्रम्प प्रशासनाने भारताच्या रशियन तेल आणि लष्करी उपकरणांच्या खरेदीवर आक्षेप घेतला आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्याने आणि व्यापारी तूट (trade deficit) असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी हे शुल्क लादले आहे.
या शुल्काचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?
या 50% शुल्कामुळे भारताच्या प्रमुख निर्यात क्षेत्रांवर—कापड, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने, ऑटो पार्ट्स—मोठा परिणाम होईल. यामुळे अमेरिकेतील भारतीय वस्तूंच्या किमती वाढतील, ज्यामुळे निर्यात 40-50% कमी होऊ शकते.