Andhra Pradesh Crime News: दारूचे व्यसन अनेक लोकांच्या आयुष्यात दुःख आणते. अनेकांनाच आयुष्य उध्वस्त करते. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. एक पुरूष दारूच्या नशेत दररोज आपल्या पत्नीशी भांडायचं. तो तिला धमकावत मारहाणही करायचा. याशिवाय तो तिच्यावर संशयही घेयचा. सतत दारू पिऊन पत्नीला त्रास देणाऱ्या व संशय घेणाऱ्या पित्याचा त्याचाच मुलाने खून केला आहे. आईला होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून मुलाने पित्यावर चाकूने वार केला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चित्तूर जिल्ह्यातील संथापेटा लेनिन नगर कॉलनीत घडली आहे.
मृत व्यक्तीचं नाव वेंकट रेड्डी (वय 50) असं असून तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकट रेड्डीला पत्नी सरस्वती आणि दोन मुलं आहेत. मोहन रेड्डी (मोठा) आणि सोमशेखर रेड्डी (धाकटा) अशी दोन मुलांची नावं आहेत. मोहनसुद्धा ट्रक ड्रायव्हर आहे, तर सोमशेखर एका मेडिकल दुकानात काम करत असतो.
हे ही वाचा: Video: "मी 2 तासांपूर्वी त्याच फ्लाइटमध्ये होतो, त्याच वेळी..." अपघातग्रस्त झालेल्या विमानाने प्रवास केल्याचा एका व्यक्तीचा दावा
वेंकट रेड्डीला दारूचे गंभीर व्यसन होते. दारूच्या नशेत तो रोज पत्नीवर संशय घेत असे, तिच्यावर आरडा-ओरडा करत असे आणि अनेकदा मारहाणही करत असे. काही महिन्यांपूर्वी त्याने पत्नीच्या डोक्यात दगडाने मारले होते. याआधीही मुलांनी पित्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले होते. मात्र तरीही त्याच्या वागण्यात बदल झाला नाही.
घटनेच्या दिवशी वेंकट रेड्डी पुन्हा नशेत घरात आला आणि हातात चाकू घेऊन पत्नीला धमकवू लागला. हे दृश्य पाहून धाकट्या मुलाचा संयम सुटला. सोमशेखरने पित्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि त्याच चाकूने त्याच्यावर वार केला. जखम गंभीर असल्यामुळे वेंकट रेड्डीचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: BCCI ला ICC कडून मोठा झटका! भारत पुढील 6 वर्षे WTC फायनलचे आयोजन करू शकणार नाही? जाणून घ्या मोठे कारण
खून केल्यानंतर सोमशेखर थेट चाकूसह पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आत्मसमर्पण केले. "मी माझ्या पित्याचा खून केला आहे," असं सांगत त्याने सर्व कबुल केलं. पोलिसांनी त्याला अटक करून शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. त्यानंतर सोमशेखर रेड्डीला न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.